पेंचमध्ये वाघाशी लढाईत बिबट्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 23:38 IST2019-05-17T23:37:36+5:302019-05-17T23:38:19+5:30
पेंच टायगर रिझर्व्हमध्ये वाघाशी झालेल्या लढाईत एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. पेंच नदीच्या जवळ संबंधित वयस्क बिबट्याचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासणीनंतर संबंधित बिबट्याचा मृत्यू पाच-सहा दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे.

पेंचमध्ये वाघाशी लढाईत बिबट्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच टायगर रिझर्व्हमध्ये वाघाशी झालेल्या लढाईत एका बिबट्याचामृत्यू झाला आहे. पेंच नदीच्या जवळ संबंधित वयस्क बिबट्याचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासणीनंतर संबंधित बिबट्याचा मृत्यू पाच-सहा दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे.
गुरुवारी सायंकाळी वन कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना पेंच नदीजवळ दक्षिण फुलझरी बीटच्या कंपार्टमेंट नंबर ५४६ मध्ये एक बिबट मृतावस्थेत आढळला. त्याचे दात, नखे व इतर अवयव सुरक्षित असल्यामुळे त्याची शिकार झाली असण्याची शक्यता नाही. यानंतर चमूने घटनास्थळापासून ५०० मीटर पर्यंतच्या परिसराचे बारीक निरीक्षण केले असता वाघ व बिबट यांचे पग मार्क आढळून आले. मृत बिबट्याच्या चेहऱ्यावर हिंसक वन्य प्राण्याने हल्ला केल्याच्या खुणा आहेत. यावरून वाघ व बिबटमध्ये आपसात लढाई झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. बिबट्याचे शवविच्छेदन एनटीसीएच्या दिशा-निर्देशानुसार करावे लागते. मात्र, मोक्का तपासणीत बराच बिलंब झाला. रात्र झाल्यामुळे शुक्रवारी सकाळी वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकांनी पोस्टमार्टम केले.