बिबट्याचे पिल्लू खापा वन परिक्षेत्रात मृतावस्थेत आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 20:13 IST2021-06-03T20:12:46+5:302021-06-03T20:13:13+5:30
leopard cub was found dead नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या खापा वन परिक्षेत्रामध्ये गुरुवारी दुपारी बिबट्याचे एक पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. ते सुमारे चार महिन्यांचे असून मादी आहे.

बिबट्याचे पिल्लू खापा वन परिक्षेत्रात मृतावस्थेत आढळले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या खापा वन परिक्षेत्रामध्ये गुरुवारी दुपारी बिबट्याचे एक पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. ते सुमारे चार महिन्यांचे असून मादी आहे.
मोहगाव-पेंढरी नाला बिटातील कोथुळना सहवन परिक्षेत्र खुबाळा येथे हा प्रकार आढळून आला. वन कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळताच वरिष्ठांना त्याची माहिती देण्यात आली. या पिल्लाचे सर्व अवयव शाबूत होते. भुकेमुळे किंवा उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. वन विभागाच्या परवानगीनंतर या पिल्लाचे शवविच्छेदन पशुधन विकास अधिकारी डॉ. रोहिणी बावसकर, रेस्क्यू सेंटरचे डॉ. सैय्यद बिलाल, मानद वन्यजीवरक्षक प्रतिनिधी आकाश कोहळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्याच्या शरीराचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे खापा वन परिक्षेत्र अधिकारी पी. ए. नाईक यांनी सांगितले.