नाेकरीच्या मागणीसाठी विधीमंडळावर लाेटांगण माेर्चा काढणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज; परवानगी नाकारल्याने आंदाेलक संतापले
By निशांत वानखेडे | Updated: December 13, 2025 19:08 IST2025-12-13T19:06:29+5:302025-12-13T19:08:38+5:30
लाेटांगण माेर्चास परवानगी नाकारल्याने आंदाेलक संतापले : यशवंत स्टेडियम परिसराला छावणीचे रूप, तीन तास तणाव

Lathi charge on youths who took out a protest march on the Legislative Assembly demanding jobs; Protesters angry over denial of permission
नागपूर : नाेकरीच्या मागणीसाठी विधीमंडळावर लाेटांगण माेर्चा काढण्याच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना शनिवारी पाेलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या. पाेलिसांनी मज्जाव केल्यानंतरही माेर्चा काढण्यावर ठाम असलेल्या आंदाेलकांना पाेलिसांच्या राेषाचा सामना करावा लागला. त्यामुळे शांततेत धरणे आंदाेलन हाेणाऱ्या यशवंत स्टेडियम परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली व संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत राज्यातील १ लाख ७५ हजार प्रशिक्षित युवक-युवतींनी ११ महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. मात्र, त्यानंतर ते पुन्हा बेरोजगार झाले. या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार व मानधनात दुप्पट वाढ मिळावी, या मागणीसाठी संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर आणि पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ह.भ.प. तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वात मंगळवारी माेर्चा काढला हाेता. त्यानंतर हे आंदाेलक गुरुवारपर्यंत तीन दिवस व रात्रीही रस्त्यावर ठान मांडून बसले हाेते. त्यानंतर त्यांना हटविण्यात आले. मात्र शुक्रवारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा आंदाेलन करण्याचा निर्धार केला व शनिवारी लाेटांगण माेर्चा काढण्याची घाेषणा केली. मात्र पाेलिसांनी त्यांच्या माेर्चाला परवानगी नाकारली हाेती.
ठरल्यानुसार हे आंदाेलक दुपारी १ वाजतापासून यशवंत स्टेडियम परिसरात माेर्चा काढण्याच्या तयारीत हाेते. आधी पाेलिसांनी त्यांना स्टेडियमच्या आत जाण्यापासून राेखले. अनेक प्रयत्नानंतर त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला. संघटनेचे शेकडाे तरुण कार्यकर्ते स्टेडियममध्ये गाेळा झाले. मात्र पाेलिसांनी स्टेडियमचे गेट बंद करून त्यांच्या आंदाेलनाला मनाई केली. त्यामुळे संतापलेल्या आंदाेलकांनी तीव्र नारेबाजी सुरू केली. आंदाेलक लाेटांगण माेर्चा काढण्यावर ठाम हाेते. पाेलिसांसाेबत बराच वेळी त्यांची शाब्दीक चकमक सुरू हाेती. परिस्थिती चिघळण्याची शक्यता पाहता अतिरिक्त पाेलिसबळ बाेलावण्यात आले.
त्यामुळे स्टेडियमला छावणीचे स्वरूप आले. इकडे आंदाेलकांचा जाेश उफाळत असल्याने पाेलिसांचा संयम सुटला व त्यांनी कार्यकर्त्यांना अटक करणे सुरू केले. यामुळे पाेलीस व आंदाेलकांमध्ये जाेरदार झटापट सुरू झाली. त्यानंतर पाेलिसांनी बळाचा वापर करीत नेतृत्वकर्ते बालाजी पाटील यांच्यासह १५ ते २० आंदाेलकांना अटक करून पाेलीस व्हॅनमध्ये काेंबले. यात महिला आंदाेलकांचा समावेश हाेता. यानंतर सायंकाळपर्यंत सर्व आंदाेलक स्टेडियममध्ये ठाण मांडून बसले हाेते.