मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे उपोषणाला बसलेल्या आंदोलकांना बळजबरीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्यानंतर वाद होऊन पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. यावेळी भडकलेल्या आंदोलकांनी दगडफेक केली. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, या लाठीचार्जनंतर राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश गृह मंत्रालयातुनच देण्यात आल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
मराठा उपोषणकर्त्यांवर लाठीमार; आंदोलकांकडून दगडफेक, जाळपोळ
जालन्यात पोलिसांनी केलेला लाठीचार्ज गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर झाला असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, जालन्यातील लाठीचार्ज हा गृहमंत्रालयातील फोननंतरच झाला आहे, पण आता प्रकरण उलट येत असल्याचे पाहून जालन्यातील एसपींवर सगळ प्रकरण ढकलण्यात येत आहे. पण मंत्रालयातील खरा आदेश देणारे कोण आहेत याची चौकशी व्हायला पाहिजे. ही चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.
मराठा आंदोलकांवर अमानुषपणे मारहाण करण्यात आली हे दुर्देवी आहे. मी याअगोदर राज्याचा गृहमंत्री राहिलो आहे. पोलीस मंत्रालयातील आदेशाशिवाय असा लाठीचार्ज करत नाही. आता राज्यात हे प्रकरण वाढत असल्याचे बघून जालना एसपींना सक्तीच्या रजेवर पाठवले जात आहे, मंत्रालयातून एसपींना कोणी फोन केला याची चौकशी व्हायला पाहिजे. मी गृहमंत्रालयातून सर्व माहिती घेतली आहे म्हणून मी याची चौकशी करण्याची मागणी करत आहे, असंही देशमुख म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर जरांगे पाटलांच्या भेटीला
मराठा आरक्षणावर उपसमितीच्या बैठकीत तोडगा निघाल्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर आणि महादेव जानकर यांनी मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी भेट घेतली असून, खोतकरांनी चर्चेसाठी दार खुलं करा, अशी विनंती जरांगे यांना केली आहे. जरांगे यांनीदेखील चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे. पण, तुम्ही जीआर घेऊन या, मगच उपोषण मागे घेतो, असं जरांगे पाटील म्हणाले.
यावेळी अर्जुन खोतकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे फोनवरुन बोलणे झाले आहे. आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केले आहे. मला खात्री आहे, मनोज जरांगे यांचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात इतर ठिकाणी मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता आहे. आरक्षणविषयक समितीही सकारात्कम निर्णय घेईल. मुख्यमंत्री लवकरच याबाबत माहिती देतील, अशी माहिती खोतकर यांनी दिली.