विकासाची भाषा विनाशाकडे नेणारी : एच.एम.देसरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 20:57 IST2018-01-16T20:52:15+5:302018-01-16T20:57:23+5:30
विकासाच्या नावावर देशाचे वाटोळे करण्याचे प्रकार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर जवाहरलाल नेहरू यांच्या बिनकामाच्या योजनाच स्वत:च्या नावावर राबवत आहे. त्यांची व त्यांच्यासारख्या जगभरातील नेत्यांची विकासाची भाषा ही विनाशाकडे नेणारी आहे, असे मत महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य व अर्थतज्ज्ञ प्रा.एच.एम.देसरडा यांनी व्यक्त केले.

विकासाची भाषा विनाशाकडे नेणारी : एच.एम.देसरडा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विकासाच्या नावावर देशाचे वाटोळे करण्याचे प्रकार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर जवाहरलाल नेहरू यांच्या बिनकामाच्या योजनाच स्वत:च्या नावावर राबवत आहे. त्यांची व त्यांच्यासारख्या जगभरातील नेत्यांची विकासाची भाषा ही विनाशाकडे नेणारी आहे, असे मत महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य व अर्थतज्ज्ञ प्रा.एच.एम.देसरडा यांनी व्यक्त केले. ‘वसुंधरा बचाव, मानव बचाव, किसान बचाव’ या अभियानांतर्गत देसरडा नागपुर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी रविभवन येथे पत्रपरिषदेदरम्यान वरील वक्तव्य केले.
१८४ देशांमधील १५ हजारांहून अधिक शास्त्रज्ञांनी हवामान बदलामुळे गंभीर धोका होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. मात्र जगातील सर्व देशांमध्ये विकासाची स्पर्धा सुरू आहे. जगात अणुऊर्जा प्रकल्प बंद होत असताना देशात त्यासाठी कोकणवर आघात सुरू आहे. जीवन उद्ध्वस्त करणे हा विकास ठरत नाही. मुळात पर्यावरण रक्षणासाठी जागतिक नेत्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो, असे प्रतिपादन देसरडा यांनी केले. देश राजकीय कंपन्यांच्या ताब्यात जातो आहे. राज्यात राबविण्यात येणारी सौर कृषिपंप योजना त्यातूनच सुरू झाली आहे. जलयुक्त शिवार योजनादेखील अपयशी ठरली आहे, असेदेखील ते म्हणाले. देशात शिक्षणक्षेत्रात सर्वाधिक निरक्षर असल्याचा अनुभव येतो. सद्यस्थितीत देशामध्ये रेशीमबाग विरुद्ध दीक्षाभूमी असा संघर्ष दिसून येत असून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोपदेखील त्यांनी लावला.