सुभाष पाळेकर : एकरी १२ लाखांच्या उत्पन्नासाठी ‘पंचस्तरीय मॉडेल’, तरुणांनो गावाकडे परत या लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आज खेड्यातील तरुण शहरात स्थलांतरित होत आहे. पुढेही अशीच स्थिती कायम राहिली, तर गावातील शेती कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी ज्याला राजा म्हटले जात होते, तो शेतकरी आज भिकारी झाला आहे, आणि भिकारी हा राजा झाला आहे. या असमान व्यवस्थेत शेतीची प्रतिष्ठा हरविली आहे. त्यामुळे गावातील तरुण हा ३०० रुपये मजुरीत शेतीत काम करायला तयार नाही, मात्र तोच तरुण केवळ १५० रुपये मजुरीत कारखान्यात आनंदाने राबत आहे. कारण नोकरी ही प्रतिष्ठेची समजली जात आहे. मात्र आता तुम्ही केवळ एक एकर शेतीत वार्षिक १२ लाख रुपयांचे उत्पादन घेऊ शकता. त्यासाठी ‘पंचस्तरीय’ फळबाग मॉडेल’ तयार आहे. त्यामुळे भूमिपुत्रांनो तुम्हाला आता कारखान्यात दुसऱ्याची गुलामगिरी करण्याची गरज नाही, स्वाभिमानाने जगण्यासाठी आपल्या खेड्याकडे परत या, असे कळकळीचे आवाहन पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी भूमिपुत्रांना केले. ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ या विषयावर मागील तीन दिवसांपासून डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिरात शुक्रवारी ते बोलत होते. या शिबिराच्या शेवटच्या आणि तिसऱ्या दिवशी पाळेकर यांनी शेतकऱ्यांना समृद्घीचा मंत्र देत सर्वांसमोर ‘पंचस्तरीय’ फळबाग मॉडेल’ सादर केले. यावेळी पाळेकर यांनी शेतकऱ्यांना केवळ मॉडेलच सांगितले नाही, तर ते अमलात कसे आणावे, हेही अतिशय सुलभ आणि सोप्या भाषेत पटवून दिले. त्यांनी आपल्या या ‘मॉडेल’ मध्ये प्रामुख्याने संत्रा, मोसंबी, आंबा व काजू या प्रमुख चार फळझाडांचा उपयोग करून त्यात डाळिंब, सीताफळ, केळी, पपई, हातगा, सिल्वर ओक, काळी मिरी, तूर, अंबाडी, बाजरी, चवळी, मटकी, वाल, मिरची गावरान, सिमला मिरची व झेंडू यांचाही समावेश केला. दरम्यान त्यांनी फळझाडांच्या लागवडीपासून तर त्यांची मशागत आणि शेवटी उत्पादनापर्यंत शेतकऱ्यांना ‘पंचस्तरीय फळबाग मॉडेल’ पटवून दिले. शिबिराचा समारोप मागील तीन दिवसांपासून डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सुरू असलेल्या ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ प्रशिक्षण शिबिराचा शुक्रवारी समारोप झाला. या शिबिरात संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात व आंधप्रदेशातील सुमारे एक हजार शेतकरी सहभागी झाले होते. यात पुरुषांसह महिला आणि तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. सुभाष पाळेकर यांनी मागील तीन दिवस सतत १०-१० तास शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ चे तंत्र आणि मंत्र सांगितले. या शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आणि आनंद झळकत होता. शिवाय प्रत्येकजण समाधान व्यक्त करीत होता. विदर्भात ‘स्ट्रॉबेरी’ कृषी विद्यापीठे ‘स्ट्रॉबेरी’ चे उत्पादन केवळ महाबळेश्वर येथेच होऊ शकते, असा दावा करतात. मात्र ते पूर्णत: खोटे बोलत असून, ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’तून विदर्भात सुद्धा ‘स्ट्रॉबेरी’ चे भरघोस उत्पादन होऊ शकते, असे यावेळी पाळेकर यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर यावर आपण स्वत: संशोधन करू न, नागपूर जिल्ह्यात एक यशस्वी प्रयोग सुद्धा केला असल्याचे ते म्हणाले. ‘स्ट्रॉबेरी’ हे थंड आणि सावलीत येणारे पीक आहे. त्यामुळे विदर्भातील ४७ ते ४८ अंश सेल्सिअसच्या तापमानात ते टिकूच शकत नाही, असा कृषी विद्यापीठांचा दावा हा फोल असून, ते शेतकऱ्यांना भ्रमित करीत असल्याचेही पाळेकर यांनी यावेळी सांगितले. तीन एकरात १९ लाखांचे उत्पादन सांगली जिल्ह्यातील खारसिंग येथील तरुण शेतकरी दत्ताजी कारे यांच्याकडे केवळ तीन एकर शेती असून, त्यात संपूर्ण द्राक्षाची बाग आहे. यावेळी ते म्हणाले, आपण पूर्वी रासायनिक शेती करीत होतो. मात्र त्यावेळी द्राक्ष उत्पादनासाठी एकरी एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येत होता. द्राक्षाच्या बागेला वर्षभर महागड्या रासायनिक खताचा डोज द्यावा लागत होता आणि रासायनिक खत दिले की, फळांवर रोगांचा प्रादुर्भाव होत होता. तो नियंत्रित करण्यासाठी वर्षातील तब्बल ८० ते ९० दिवस विषारी औषधांची फवारणी करावी लागत होती. या खर्चाने अर्धे कंबरडे मोडत होते. यानंतर पिकविलेल्या द्राक्षांना चांगला भाव मिळाला नाही, तर उत्पादन खर्चही निघत नव्हता. यातच मागील तीन वर्षापूर्वी ‘नैसर्गिक शेती’चा मार्ग सापडला. आता तोच उत्पादन खर्च एकरी एक ते दीड लाखांवरून केवळ १० ते १५ हजार रुपयांपर्यंत कमी झाला आहे. शिवाय द्राक्षांच्या दर्जात प्रचंड सुधारणा झाली आहे. सोबतच रासायनिक द्राक्षाच्या तुलनेत या द्राक्षाला प्रचंड मागणी वाढत असून, दुप्पट भाव मिळत आहे. यामुळे मागील वर्षी तीन एकरातील द्राक्ष बागेतून १९ लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे. -दत्ताजी कोरे, खारसिंग, सांगली. कृषी सेवा केंद्र बंद करून नैसर्गिक शेतीचा मार्ग पकडला आपल्याकडे एकूण पाच एकर शेती आहे. शिवाय कृषी सेवा केंद्र होते. मागील २००९ पर्यंत कृषी सेवा केंद्र चालविले. स्वत:चेच कृषी सेवा केंद्र असल्याने शेतीत रासायनिक खते आणि विषारी औषधीचा भडीमार सुरू होता. मात्र काहीच दिवसांत त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. आपण वारंवार आजारी पडत होतो. त्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंता करीत होते. शेवटी कृषी सेवा केंद्र बंद करण्याचा निर्णय
भूमिपुत्रांनो आता गुलामगिरी नको!
By admin | Updated: May 6, 2017 02:33 IST