भूमी अभिलेखचे कर्मचारी संपावर
By Admin | Updated: August 21, 2014 01:30 IST2014-08-21T01:14:32+5:302014-08-21T01:30:51+5:30
महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संयुक्त कर्मचारी संघटनेने केलेल्या आवाहनानुसार नागपूरसह विदर्भातील भूमी अभिलेख कर्मचारी शनिवारपासून बेमुदत संपावर गेले. त्यामुळे कामकाज ठप्प झाले.

भूमी अभिलेखचे कर्मचारी संपावर
बेमुदत संप: पाच दिवसापासून कामकाज ठप्प
नागपूर : महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संयुक्त कर्मचारी संघटनेने केलेल्या आवाहनानुसार नागपूरसह विदर्भातील भूमी अभिलेख कर्मचारी शनिवारपासून बेमुदत संपावर गेले. त्यामुळे कामकाज ठप्प झाले.
हा संप राज्यव्यापी आहे. नागपूरसह विदर्भातील एक हजारावर कर्मचारी पहिल्या दिवशी संपात सहभागी झाले होते. एकाही कार्यालयात काम झाले नाही. नागपूरच्या कार्यालयात १७४ कर्मचारी आहेत. त्यापैकी १५६ कर्मचारी संपात सहभागी झाले होते. विभागात ३४१ कर्मचारी आहेत. त्यापैकी २६२ कर्मचारी संपावर गेले होते, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण भोयर आणि सचिव मुकेश सेलोकर यांनी सांगितले. विदर्भात संपाला ८० टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेचे सरचिटणीस श्रीराम खिरेकर यांनी केला.
संपामुळे जमीन मोजणी, फेरफारसह इतरही कामांना फटका बसला असून, त्यामुळे मिळणाऱ्या महसुलावर शासनाला पाणी सोडावे लागले.
भूमी अभिलेख खाते तांत्रिक करण्यात यावे, या खात्यातील कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतनश्रेणी लागू करावी, लिपिकऐवजी भूमापक असे पदनाम तयार करावे, राज्यात २५ नवीन नगर रचना कार्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, या प्रमुख मागण्यांसह संघटनेच्या एकूण १५ मागण्या आहेत. यापूर्वी संघटनेने काळ्या फिती लावून आंदोलन केले होते व १२ आॅगस्टला धरणे दिली होती. मात्र यानंतरही शासनाने दखल न घेतल्याने कर्मचारी शनिवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. (प्रतिनिधी)