भूमाफिया धापोडकरने आदिवासींच्या जमिनी हडपल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST2021-05-23T04:08:55+5:302021-05-23T04:08:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गुन्हे शाखेच्या कस्टडीत असलेला भूमाफिया संजय धापोडकर याने गँगस्टर रंजीत सफेलकरच्या टोळीला हाताशी धरून ...

भूमाफिया धापोडकरने आदिवासींच्या जमिनी हडपल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या कस्टडीत असलेला भूमाफिया संजय धापोडकर याने गँगस्टर रंजीत सफेलकरच्या टोळीला हाताशी धरून नागपूर शहरालगतच्या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या. यात मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्याही जमिनी असून, प्रतिबंध असतानादेखील या जमिनीवर त्याने लेआउट टाकून हजारो लोकांना भूखंड विकल्याची माहिती चर्चेला आली आहे.
कामठीजवळच्या शेतकरी बापलेकाचे अपहरण करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत गँगस्टर रंजीत सफेलकर, भूमाफिया संजय धापोडकर आणि त्यांच्या साथीदारांनी कोट्यवधींची जमीन हडपली होती. या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सफेलकर, धापोडकर आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. सध्या ते गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून फसवणुकीचे नवनवीन किस्से उघड होत आहेत. दुसरीकडे फसगत झालेल्याच्या तक्रारींचाही ओघ वाढत आहे. दरम्यान, धापोडकरने नागपूर शहराला लागून असलेल्या भिलगाव, येरखेडा, कामठी, कामगारनगर, कळमना, बुटीबोरी हिंगणा, वाडी कान्होलीबारा, कळमेश्वर आदी ठिकाणीही शेतकऱ्यांच्या जमिनी धोक्याने हडपल्या असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. यातील अनेक जमिनी आदिवासींच्या आहेत. त्या विकता येत नसल्याचे माहीत असूनही त्यावर लेआउट टाकून धापोडकर आणि साथीदारांनी हजारो लोकांना भूखंड विकले आणि त्यांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत केले. त्या माध्यमातून धापोडकरने मुंबई, पुण्यातही मालमत्ता विकत घेऊन ठेवल्याचे समजते.
---
मित्र, नोकरांच्या नावाने मालमत्ता
आपले पाप उघड होईल याची भीती असल्यामुळे धापोडकरने त्याचे दूरचे नातेवाईक, मित्रमंडळी, साथीदार तसेच नोकरांच्या नावानेही कोट्यवधीची मालमत्ता लिहून ठेवली आहे. पोलीस तपासात त्याचे पाप उघड होण्याचे संकेत आहेत.
---