आंबेडकर स्मारकाच्या जागेचा तिढा सुटला
By Admin | Updated: June 21, 2016 02:40 IST2016-06-21T02:40:59+5:302016-06-21T02:40:59+5:30
यशवंत स्टेडियम येथील २.४० एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारक व अभ्यास केंद्रासाठी उपलब्ध करण्याचा

आंबेडकर स्मारकाच्या जागेचा तिढा सुटला
नागपूर : यशवंत स्टेडियम येथील २.४० एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारक व अभ्यास केंद्रासाठी उपलब्ध करण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी एकमताने घेण्यात आला. तसेच हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून शासनाकडे भूमिका मांडण्यावर सहमती झाली. सोबतच येथील काही जागा बस डेपोला देण्याच्या प्रस्तावावरून निर्माण झालेला वाद निकाली निघाला आहे.
१९९२ मध्ये महापालिकेने यशवंत स्टेडियमच्या बाजूच्या जागेच्या आरक्षणाचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. त्यातील आरक्षणानुसार राज्य सरकारच्या निर्देशानुसार या जागेचा विषय सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला होता. त्यात शहर बस डेपोसाठी जागा आरक्षित करण्याचा समावेश होता. या प्रस्तावाला काँग्रेस व बसपा व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोध दर्शविला. डेपोला जागा देण्याचा प्रस्ताव सरकारकडे परत पाठवून येथील संपूर्ण जागा स्मारकासाठी उपलब्ध करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे, बसपाचे किशोर गजभिये व गौतम पाटील, राहुल तेलंग आदींनी केली. विरोधी सदस्यांनी यासाठी आग्रही भूमिका घेत महापौरांच्या आसनापुढे धाव घेत सभागृहात गोंधळ घातला.