तस्करीतील कोट्यवधींचा निधी दहशतवाद्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:20 IST2017-10-10T00:19:42+5:302017-10-10T00:20:14+5:30

अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळणारा कोट्यवधींचा निधी दहशतवाद्यांकडे पोहचविला जातो.

Lakhs of smuggled funds to terrorists | तस्करीतील कोट्यवधींचा निधी दहशतवाद्यांकडे

तस्करीतील कोट्यवधींचा निधी दहशतवाद्यांकडे

ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी घेतली बैठक : अमली पदार्थांची तस्करी करणाºयांवर कडक कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळणारा कोट्यवधींचा निधी दहशतवाद्यांकडे पोहचविला जातो. एकीकडे तरुणाईला व्यसनाधीन करायचे आणि दुसरीकडे दहशतवाद्यांचे कलुषित मनसुबे पूर्ण करण्यासाठी रसद पुरवायची, असे हे दुहेरी कारस्थान आहे. त्यामुळे अमली पदार्थ तस्करीचे देशापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ते पेलण्यासाठी देशात नशामुक्तीची (ड्रग फ्री) चळवळ प्रभावीपणे रेटायची आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पत्रकारांना दिली.
यावेळी डीजी डॉ. आर.पी. सिंह, डीडीजी एम.ए. जैन व सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे उपस्थित होते. सरकारने सुरक्षा यंत्रणांच्या वेगवेगळ्या विभागांना अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. याच संबंधाने विविध उपक्रम राबवून जनजागरणही करण्यात येणार आहे. त्यासाठी सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शाळा-महाविद्यालयात जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही अहीर यांनी सांगितले.
अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी काय उपाययोजना करायच्या, यावर चर्चा करण्यासाठी नागपूर पोलीस आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या संयुक्त विद्यमाने सोमवारी विविध विभागाच्या उच्चाधिकाºयांची बैठक (वेस्टर्न झोन कॉन्फरन्स) घेण्यात आली. या बैठकीला केंद्र व राज्य सरकारमधील विविध विभागाचे उच्चाधिकारी उपस्थित होते. दोन सत्रात झालेल्या या बैठकीत पहिल्या सत्रात अधिकाºयांसोबत स्वयंसेवी संस्था, संघटनांचे पदाधिकारी आणि महाविद्यालयांचे प्राचार्यही सहभागी झाले होते. त्यांनी अमली पदार्थ तस्करीला रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या.
बैठकीनंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अमली पदार्थांची तस्करी वाढवून देशातील तरुणाई नासविण्याचे प्रयत्न केले जात आहे. यातून मिळणारा कोट्यवधींचा निधी घातपाताचे मनसुबे रचणाºया दहशतवादी, नक्षलवाद्यांना पोहचवला जातो. काश्मीरमधून मुंबईत १०० कोटींची चरस पोहचवली जायची आणि त्यातील बराचसा पैसा दहशतवाद्यांकडे वळता केला जायचा. विविध राज्यातून गांजा, चरस, अफूची देशातील विविध प्रांतात तस्करी केली जाते. हे आता उघड झाले आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानातून पंजाबमध्ये नियमित विविध प्रकारचे अमली पदार्थ पाठवून त्याआधारे तरुणाईला भडकविण्याचे, तरुणाईला वाममार्गावर नेण्याचे कटकारस्थान केले जायचे. परिणामी पंजाब पेटला होता. हे लक्षात आल्यानंतर पंजाबमधील दहशतवाद संपवून तेथे वातावरण शांत करण्यात यश आले. आता अशाच प्रकारचे कटकारस्थान करून देशातील तरुणाईला बिघडवण्याचे प्रयत्न केले जात आहे. हे कटकारस्थान हाणून पाडण्यासाठी केंद्र सरकारने अमली पदार्थाच्या तस्करीला प्रभावी पायबंद घालण्याचा निर्णय घेतला आहे. अमली पदार्थ कोणताही असो, तो देशातीलच राज्यातून येवो की विदेशातून त्यावर अंकुश घालण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी सरकारने प्रयत्नशील आहे. त्यासाठी केवळ पोलीसच नव्हे तर आरपीएफ (रेल्वे), सीआयएसएफ (विमान), कोस्ट गार्ड (समुद्रीतट), बीएसएफ (देशाच्या सीमेवरून) यांनाही अमली पदार्थ तस्करांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहे. सरकारने गेल्या तीन वर्षात १७ प्रकारच्या अमली पदार्थांवर प्रतिबंध घातल्याची माहितीही अधिकाºयांनी दिली.
‘ड्रग कंट्रोलिंगसाठी गुजरात पॅटर्न’
एकीकडे अमली पदार्थ तस्करीवर अंकुश लावायचा आणि दुसरीकडे दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी प्रभावी जनजागरण करायचे. तस्करांचे टार्गेट तरुणाई असल्यामुळे शाळा महाविद्यालयात या संबंधाने विशेष कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासाठी आम्ही स्वयंसेवी संस्था आणि शैक्षणिक संस्था, मेडिकल, फार्मसीचीही मदत घेणार असल्याचे अहीर म्हणाले. गुजरातने यापूर्वी ‘ड्रग कन्ट्रोलिंग’साठी चांगले उपक्रम राबविले आणि त्यात गुजरात सरकारला यशही मिळाले. त्यामुळे ‘ड्रग कन्ट्रोलिंगसाठी गुजरात पॅटर्न’चा वापर केला जाणार असल्याचेही अहीर म्हणाले. त्याच पार्श्वभूमीवर, मध्यभारतातील ही पहिली बैठक नागपुरात घेण्यात आल्याचे ते म्हणाले. यापुढे अशाच प्रकारच्या बैठका विविध राज्यात घेऊन उपाययोजना प्रभावी करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
उत्पादन नष्ट करणारी फवारणी
अनेक राज्यात गांजाची शेती, अफूंचे उत्पादन केले जाते, हे उत्पादनच का थांबवत नाही, असा प्रश्न केला असता त्या संबंधानेही आम्ही त्या-त्या राज्याला दिशानिर्देश देत आहोत. जेथे अशा प्रकारे उत्पादन केले जाते, तेथे तणनाशक जसे फवारले जाते तशी विशिष्ट रसायनाची फवारणी करून अमली पदार्थांचे पीकच नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे अहीर यांनी सांगितले. नागपुरात मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू असून विविध प्रकारचे ड्रग पुरवून तरुणाईला व्यसनाधीन करण्यात येत असल्याकडे अहीर यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, बैठकीत यावर चर्चा झाली. पोलिसांना कडक कारवाई करण्याचे अधिकार देण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

Web Title: Lakhs of smuggled funds to terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.