नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी गंभीरतेचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 10:55 AM2021-02-09T10:55:16+5:302021-02-09T10:55:39+5:30

Nagpur News अलीकडच्या काळात ऑनलाइन गुन्हे वाढले आहेत. नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी गंभीरतेचा अभाव असण्याचे हे लक्षण आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Lack of seriousness about internet security among citizens | नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी गंभीरतेचा अभाव

नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी गंभीरतेचा अभाव

googlenewsNext
ठळक मुद्देऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे वाढले

अंकिता देशकर

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे नागरिकांचा ऑनलाइन व्यवहार करण्याकडे कल वाढला आहे. सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेऊन असुरक्षित ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांना लुबाडत आहेत. अलीकडच्या काळात ऑनलाइन गुन्हे वाढले आहेत. नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी गंभीरतेचा अभाव असण्याचे हे लक्षण आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सुरक्षित इंटरनेट दिवसानिमित्त ‘लोकमत’ने काही तज्ज्ञांशी चर्चा केली असता यासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण बाबी पुढे आल्या. सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल माने यांच्यानुसार, नागरिकांना ऑनलाइन फसवणूक होते हे माहिती असतानाही ते गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. तंत्रज्ञानासोबत गुन्हे करण्याच्या पद्धतीमध्येही बदल होत आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांना ऑनलाइन दारू विक्रीचे प्रलोभन दाखवण्यात आले होते. नागरिकांना फसवण्यासाठी गुन्हेगार अशा विविध क्लुप्त्या वापरत असतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ऑनलाइन फसवणुकीपासून स्वत:चे संरक्षण करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. त्यांनी इंटरनेटवर कुणालाही गोपनीय माहिती देऊ नये. सोशल मीडियावरून एकमेकांना छायाचित्रे पाठवणेही धोकादायक आहे. हॅकर्स ही छायाचित्रे विविध वेबसाइटवर वापरून नागरिकांना ब्लॅकमेल करू शकतात.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी विभागात सायबर लॉ विषय शिकवणाऱ्या प्रा. श्रुती वाघेला यांनी सध्याच्या परिस्थितीत इंटरनेट सुरक्षित नसल्याचे मत व्यक्त केले. इंटरनेट सुरक्षेविषयी नागरिक जास्त जागृत नाहीत. बाजारात स्मार्टफोन स्वस्त किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्गातील नागरिक स्मार्टफोन खरेदी करू शकतात. परंतु, ऑनलाइन व्यवहारासाठी लागणारी माहिती त्यांच्याकडे नसते. त्यामुळे इंटरनेट सुरक्षेसंदर्भात व्यापकस्तरावर जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक आहे. याशिवाय नागरिकांनी जुने फोन खरेदी करणे व विकणे टाळले पाहिजे. बरेचदा जुन्या फोनमधील सर्वच माहिती रद्द होत नाही. त्याचा दुरूपयोग केला जाऊ शकतो. तसेच सायबर गुन्हे थांबविण्यासाठी कडक कायदा लागू झाला पाहिजे, असे वाघेला यांनी सांगितले.

सायबर तज्ज्ञ महेश रखेजा यांच्यानुसार सायबर गुन्हे थांबविण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरिकांना स्ट्राँग पासवर्ड ठेवण्याची सूचना केली जाते. असे असताना अकाउण्ट हॅक केले जाते. नवीन तांत्रिक बाबींची वेळोवेळी माहिती करून घेणे हा यावर एकमेव उपाय आहे. हल्लीचे चोरटे डिजिटल झाले आहेत. त्यामुळे अधिक सावध राहणे गरजेचे आहे, असे रखेजा यांनी सांगितले.

काय आहे सुरक्षित इंटरनेट दिवस

दरवर्षी फेब्रुवारीमध्ये द्वितीय आठवड्यातील दुसऱ्या दिवशी सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा केला जातो. ही परंपरा २००४ पासून सुरू आहे. नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी जागृती व संवाद घडवून आणणे हा या दिवसाचा उद्देश आहे.

सुरक्षित इंटरनेटसाठी टिप्स

१ - दुसऱ्याला ओटीपी सांगू नये.

२ - सोशल मीडियावर छायाचित्रे पाठवणे टाळावे.

३ - ऑफर्स व प्रमोशनच्या लिंक उघडू नये.

४ - अज्ञात स्त्रोताकडून येणारी छायाचित्रे व व्हिडिओवर क्लिक करू नये.

५ - संशयास्पद क्रमांकाचे कॉल उचलू नये.

६ - पासवर्ड कुणालाही सांगू नये.

७ - वाचल्याशिवाय अटी व शर्ती मान्य करू नये.

८ - इंटरनेट वापरत असताना जीपीएस बंद ठेवावे.

Web Title: Lack of seriousness about internet security among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.