ग्रामीण भागासाठी शहरात व्हावे कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:07 IST2021-05-24T04:07:01+5:302021-05-24T04:07:01+5:30
नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रत्येक तालुक्यात १५ बेडचे ‘चाईल्ड कोविड केअर सेंटर’ उभारणार आहे. ...

ग्रामीण भागासाठी शहरात व्हावे कोविड केअर सेंटर
नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रत्येक तालुक्यात १५ बेडचे ‘चाईल्ड कोविड केअर सेंटर’ उभारणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील एका पीएचसीची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात सेंटर उभारण्यापेक्षा विरोधी पक्षासह सत्तापक्षातील काही सदस्यांनी ग्रामीण भागासाठी शहरात जम्बो कोविड केअर सेंटर उभारावे, अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सरपंच भवनाचा त्यासाठी उपयोग करावा, अशी मागणी सर्वसाधारण सभेत केली.
तिसऱ्या लाटेत कोरोना बालकांच्या आरोग्याला धोका पोहोचविणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात जो हाहाकार माजविला होता, त्यापेक्षाही तिसरी लाट भीषण राहणार असल्याचे बोलले जात आहे. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे निघाले होते. रुग्ण गंभीर झाल्यानंतर उपचारासाठी शहरातील रुग्णालयाशिवाय पर्याय नव्हता. रुग्णालयेही हाऊसफुल्ल असल्याने बेडची उपलब्धता नव्हती. त्यामुळे अनेक रुग्णांना गावी परत घेऊन जावे लागले. तिसऱ्या लाटेच्या नियोजनाबाबत जिल्हा परिषद गंभीर आहे. प्रत्येक तालुक्यात १५ बेडचे एक चाईल्ड कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील एका पीएचसीमध्ये हे सेंटर उभारण्यात येणार आहे. प्रत्येक पीएचसीसाठी ५० लाख रुपयांची मागणी जिल्हा परिषदेने शासनाकडे केली आहे. त्याचबरोबर काही योजनांचा निधीही या सेंटरसाठी वळता करण्यात येणार आहे; पण विरोधी पक्षातील सदस्य व काही सत्तापक्षातील काही सदस्यांनी तालुकास्तरावर सेंटर उभारण्यापेक्षा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण भागासाठी जम्बो कोविड केअर सेंटर उभारावे, अशी मागणी केली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सरपंच भवनाचा उपयोग करावा, असाही सल्ला सदस्यांनी दिला आहे.
- चाईल्ड कोविड केअर सेंटरमध्ये फक्त लहान मुलांवरच उपचार होणार आहेत; पण इतर वयोगटांतील रुग्णांना गंभीर झाल्यास शहरावरच अवलंबून राहावे लागणार आहे. जिल्हा परिषदेची सरपंच भवनाची स्वत:ची इमारत आहे. मोठा हॉल उपलब्ध आहे. राहण्याची सोय, पार्किंगची सुविधा येथे आहे. किमान ५०० लोकांवर एकाच वेळी उपचार करता येणे येथे शक्य आहे. आपत्कालीन परिस्थितीत शहरातील रुग्णालयातही सहज हलविता येणार आहे. त्यामुळे याचा विचार व्हायला हवा होता.
- संजय झाडे, जिल्हा परिषद सदस्य
- एका तालुक्यासाठी १५ बेडचे सेंटर पुरेसे होणार नाही. मनुष्यबळाचाही अभाव असल्याने प्रत्येक सेंटरवर अपेक्षित मनुष्यबळ पुरविणे अवघड जाईल. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी संपूर्ण यंत्रणा एकत्रित आल्यास, उपचारांची गती वाढले. शहरात बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाला गावी परत न्यावे लागणार नाही. शहरातच उपचार होऊ शकतील. त्यामुळे आमची मागणी आहे की, जिल्हा परिषदेचे कोविड केअर सेंटर शहरात तयार व्हावे.
- व्यंकट कारेमोरे, विरोधी पक्षनेते, जिल्हा परिषद