कोविड : लहान मुलांसाठी ७०० खाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST2021-05-23T04:07:23+5:302021-05-23T04:07:23+5:30

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा बैठकीतील महत्त्वाचे निर्देश ग्रामीण रुग्णालयासाठी २५ कोटींचा सामाजिक दायित्व निधी पेडियाट्रीक-कोविड आजारासाठी ७०० बेड निर्माण करण्याचे ...

Kovid: 700 beds for children | कोविड : लहान मुलांसाठी ७०० खाटा

कोविड : लहान मुलांसाठी ७०० खाटा

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

बैठकीतील महत्त्वाचे निर्देश

ग्रामीण रुग्णालयासाठी २५ कोटींचा सामाजिक दायित्व निधी

पेडियाट्रीक-कोविड आजारासाठी ७०० बेड निर्माण करण्याचे आदेश

खासगी रुग्णालयांनी महानगरपालिकेला तातडीने हिशेब सादर करावा

टेस्टिंग लॅब खरेदीचे आदेश द्यावे

मेयो-मेडिकलच्या ग्रामीण भागाच्या रुग्णसेवेची आकडेवारी जाहीर करा

म्युकरमायकोसिस रुग्णसेवेसाठी औषधोपचार पद्धत ठरवा

ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे नागरूरची वाटचाल गतिशील करण्याचे निर्देश

रुग्णवाढ कमी झाल्याने बेसावध राहू नका; घराबाहेर पडू नका

पोलिसांनी संयुक्त कारवाई कायम ठेवावी; रिकामटेकड्यांची चाचणी करावी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : म्युकरमायकोसिस, पेडियाट्रीक-कोविड आजारासाठी महानगर व जिल्हा प्रशासनाने वेळीच सर्व उपाययोजना कराव्यात. लहान मुलांसाठी किमान ७०० बेड उपलब्ध करण्यात यावेत. ग्रामीण रुग्णालय सक्षम करण्यासाठी तसेच कोविड रुग्णांसाठी २५ कोटी रुपयांचा सामाजिक दायित्व निधी वापरावा. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना कोविडनंतरच्या या आजारातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, असे निर्देश ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी येथे दिले.

शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये नागपूर जिल्ह्यातील कोविड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डी.एस. सेलोकार उपस्थित होते.

बैठकीत संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांच्या आजाराला नियंत्रित करण्यासाठीच्या उपाययोजनांवर प्रामुख्याने चर्चा झाली. सध्या प्रशासनाकडे साडेतीनशे बेड उपचारासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. ही संख्या ७०० पर्यंत वाढविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यासाठी ऊर्जा विभागातील सामाजिक दायित्व निधीमधून २५ कोटी रुपये पालकमंत्री यांनी उपलब्ध करून दिले आहेत. म्युकरमायकोसिस उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांसंदर्भातील पाठपुरावा करण्यात करावा, अशा सूचना केल्या.

बॉक्स

बेसावध राहू नका

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी बेसावध राहू नये. लगतच्या अमरावती येथील कोरोना काळातील अनुभव ताजा असून त्या ठिकाणी रुग्ण संख्या कमी झाल्या नंतर अचानक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढायला लागली. ही परिस्थिती नागपुरात पुन्हा उद्भवू नये, यासाठी चाचणी करणे, तपासणी व लसीकरण करण्याचे निर्देश पाालकमंत्र्यांनी दिले.

बॉक्स

खासगी रुग्णालयांनी मनपाला हिशोब द्यावा

शहरातील खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सामाजिक दायित्वातून चांगले काम केले. मात्र वैद्यकीय समुदायातील काही लोकांनी यावेळी चुका केल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे काही मोजक्या डॉक्टरांच्या गैरवर्तनाचा दोन्ही लाटेत काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांच्या मेहनतीवर, प्रतिमेवर व प्रयत्नांवर विरजण पडू नये. तसेच डॉक्टर संघटनांनी शासकीय निर्देशानुसार महानगरपालिकेला मागणीप्रमाणे हिशेब सादर करावा,असे आवाहन पालकमंत्री राऊत यांनी केले.

Web Title: Kovid: 700 beds for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.