उधारीत जेवण न दिल्याने केला कटरने वार; भोजनालयाचा मालक जखमी
By दयानंद पाईकराव | Updated: May 27, 2023 17:39 IST2023-05-27T17:39:03+5:302023-05-27T17:39:37+5:30
Nagpur News उधारीत जेवण न दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका मद्यपीने कटरने वार करून शिव भोजनालयाच्या मालकाला जखमी केले.

उधारीत जेवण न दिल्याने केला कटरने वार; भोजनालयाचा मालक जखमी
दयानंद पाईकराव
नागपूर : उधारीत जेवण न दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका मद्यपीने कटरने वार करून शिव भोजनालयाच्या मालकाला जखमी केले. ही घटना तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गोळीबार चौकात घडली.
गोळीबार चौकात शिव भोजनालय आहे. भोजनालयाचे मालक विजय सुभाष पौनीकर (वय ५०, रा. तांडापेठ, जुनी वस्ती पाचपावली) हे दोन वर्षांपासून थाळी वाटप व फोटो काढण्याचे काम करतात. त्यांच्या भोजनालयात आरोपी प्रदीप नामदेव निखारे (वय ३०, रा. मोचीपुरा, पाचपावली) हा जेवण करण्यासाठी येत असल्यामुळे पौनीकर त्याला ओळखतात. शुक्रवारी आरोपी प्रदीप दारू पिऊन त्यांच्या भोजनालयात आला. त्याने माझ्याकडे पैसे नाही, मला जेवण द्या, असे म्हटले. पौनीकर यांनी पैसे दिल्यानंतर जेवण देतो असे म्हटल्याने आरोपीने त्यांच्याशी असभ्य वर्तन केले. त्यामुळे तेथील लोकांनी आरोपीला हाकलून लावले. परंतु दहा मिनिटानंतर आरोपी पुन्हा परत आला व त्याने कटरने पौनीकर यांच्या डोक्यावर व डाव्या हातावर वार करून त्यांना जखमी केले. त्यांच्यावर मेयो हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. पौनीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी आरोपी प्रदीपविरुद्ध कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.