Kites and manja turnover of Rs 5 crore: Sales market booms in Nagpur | पतंग व मांजाची पाच कोटीची उलाढाल : नागपुरात  विक्रीचा बाजार तेजीत

पतंग व मांजाची पाच कोटीची उलाढाल : नागपुरात  विक्रीचा बाजार तेजीत

ठळक मुद्दे दोन दिवसच विक्री, पतंगाला अन्य राज्यात मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : मकरसंक्रांतीला एक दिवस उरला असून पतंग आणि मांजाचा बाजार तेजीत आहे. नागपुरातील सर्वात मोठ्या जुनी शुक्रवारी आणि इतवारी या मुख्य बाजारात ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांची जवळपास ३०० पेक्षा जास्त दुकाने सजली आहेत. दहा फूट मोठी आकर्षक पतंग युवकांचे लक्ष वेधून घेत आहे. सर्व दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. आठवडाभर चालणाऱ्या या व्यवसायात पाच कोटीची विक्री होत असल्याचे एका पतंग व्यावसायिकाने सांगितले.

सध्या शहरातील बाजारपेठा वेगवेगळ्या आकारातील पतंग आणि मांजानी सजल्या आहेत. नागपुरात बाबुळखेडा, बेझनबाग, तांडापेठ, हसनबाग, जुनी शुक्रवारी या भागात मोठ्या प्रमाणात पतंग तयार करण्याचे कारखाने असून, वर्षभर ते हाच उद्योग करतात. तेथून छत्तीसगड, मध्य प्रदेशसह संपूर्ण विदर्भात पतंग विक्रीसाठी जातात. याशिवाय गुजरातमधून विविधरंगी पतंग नागपुरात विक्रीसाठी येतात. तर उत्तर प्रदेशच्या बरेली येथूनही मांजा नागपुरात येतो. नायलॉन मांजावर प्रतिबंध आल्याने विक्रेत्यांनाही बरेली मांजाला प्राधान्य दिले आहे. तयार मांजाच्या चक्रीची हजार रुपयापर्यंत विक्री होते. गेल्या तीन दिवसापासून दुकानात खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. मंगळवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत बाजार सुरू राहणार आहे.

मकरसंक्रांतीला बालकांपासून वयस्कांपर्यंत प्रत्येक जण संक्रांतीला पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात. तांडापेठ भागातील पतंग उत्पादक निशांत खापरे म्हणाले, पतंग आणि मांजा तयार करण्याचा पिढीजात व्यवसाय आहे. वेगवेगळ्या आकारातील ५० हजाराच्या आसपास पतंग तयार करतो. या मालाची नागपूरसह संपूर्ण विदर्भात विक्री होते. पतंग तयार करणे ही कला आहे. एक मोठी पतंग तयार करण्यासाठी साधारणत: १५ ते २० मिनिटे लागतात. नागपूर पतंगाची मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी कोट्यवधी रुपयाची उलाढाल होते.

९०० रुपयाची १० फूट पतंग

जुनी शुक्रवारी येथील विक्रेते मानसी आदमने म्हणाल्या, आम्ही चार जणांनी एक वेबसाईट तयार करून केवळ पतंगाच्या विक्रीला प्राधान्य दिले आहे. याशिवाय दुकानात केवळ पतंगांची विक्री करण्यात येत आहे. दहा फूट उंच रंगीबिरंगी पतंग ९०० रुपयात विक्रीला आहे.

मांजामध्ये ४० पेक्षा जास्त प्रकार

मांजामध्ये ४० पेक्षा अधिक प्रकार आहेत. साधारणत: एका चक्रीमध्ये तीन ते सहा रिल मांजा येतो. बरेली आणि संखल मांजाचा दर्जा चांगला असल्यामुळे तो महाग आहे. बाजारात अग्नी, संखल, संखल आठ, महासंखल आठ, एके ५६, गेंडा, हातोडा, कलिंगडा अशा नावाचे मांजा विक्रीला आहेत. यावर्षी मांजाच्या किमतीत वाढ झाली आहे. मांजा भरलेल्या चक्रीला मागणी आहे. वेगवेगळ्या कंपनीचे दोरा असलेले रिल घेऊन वस्त्यांमध्ये मांजा तयार करण्याचे प्रमाण कमी झाले असून, भरलेल्या चक्रीची खरेदी करीत आहेत.

नायलॉनऐवजी देशी मांजाला मागणी, युवकांची निदर्शने

नायलॉन मांजाच्या विक्रीवर प्रतिबंध असल्यानंतरही चोरट्या मार्गाने आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून विक्री सुरूच आहे. पण हे प्रमाण कमी आहे. बहुतांश विक्रेत्यांनी नायलॉन मांजाच्या विक्रीला विरोध करीत नऊ धाग्याच्या बरेली मांजाच्या विक्रीवर भर दिला आहे. एक ते चार रिलपर्यंत मांजाची २०० ते एक हजार रुपयापर्यंत विक्री होत आहे. आता युवकांमध्ये जागृती आली असल्याने तेसुद्धा नायलॉन मांजाला विरोध दर्शवीत आहेत. मंगळवारी एका युवकाचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू झाल्यानंतर जुनी शुक्रवारी रोडवर युवकांच्या एका संघटनेने बुधवारी नायलॉन मांजाला विरोध करण्यासाठी आंदोलन केले.

Web Title: Kites and manja turnover of Rs 5 crore: Sales market booms in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.