‘भीमराज की बेटी’ किरण पाटणकरांचे निधन; आंबेडकरी चळवळीचा आवाज हरपला
By निशांत वानखेडे | Updated: February 5, 2024 19:23 IST2024-02-05T19:23:11+5:302024-02-05T19:23:22+5:30
किरण पाटणकर यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे झाला.

‘भीमराज की बेटी’ किरण पाटणकरांचे निधन; आंबेडकरी चळवळीचा आवाज हरपला
नागपूर: धम्मक्रांतीचा प्रचार-प्रसार करून आंबेडकरी चळवळ जनमानसात रुजविणाऱ्या लाेकगायकांमध्ये प्रमुख नाव असलेल्या व लाेकप्रिय गायक नागाेराव पाटणकर यांचा गाैरवास्पद वारसा अधिक उंचावर नेत, स्वत:ची ‘भीमराज की बेटी’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध गायिका किरण पाटणकर यांचे साेमवारी दीर्घ आजाराने बेझनबाग येथील निवासस्थानी निधन झाले. त्या ६२ वर्षांच्या हाेत्या. त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात मुलगा व बराच माेठा आप्तपरिवार आहे.
किरण पाटणकर यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे झाला. काही महिन्यांनंतर त्यांचे कुटुंब नागपूरला स्थानांतरित झाले. त्यांचे वडील नागाेराव पाटणकरांची लाेकप्रियता त्या काळात शिखरावर हाेती. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत भाऊ प्रकाशनाथ आणि त्या पाठाेपाठ किरण यांनीही गायनाच्या क्षेत्रात पदार्पण केले. किरण यांना बालपणापासूनच गायनाची आवड हाेती व वेगवेगळ्या कार्यक्रमांतून त्यांची कला बहरत हाेती. लाेकगायक व कव्वाल म्हणून या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अल्पावधीत त्यांची ओळख निर्माण झाली.
त्या काळात गावाेगावी हाेणाऱ्या शंकरपट, मंडई, मेळावे अशा कार्यक्रमांमधून त्यांच्या कव्वालीचा बाज बहरत गेला. आंबेडकरी जलशांमधून किरण पाटणकरांचा आवाज घुमत गेला. आनंद शिंदे, जानीबाबू, मज्जिद शाेला अशा त्या काळातील सर्व माेठ्या गायकांसाेबत किरण यांचा दुय्यम कव्वालीच्या सामन्यांची लाेक आतुरतेने वाट पाहायचे. अशा कार्यक्रमात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धांच्या गीतांची फर्माईश ही ठरलेली असायची. किरण पाटणकर यांनी शेकडाेच्या संख्येने भीमगीते गायली असून, त्यांच्या गीतांच्या कॅसेट्स आणि सीडी जनमानसांमध्ये प्रचंड लाेकप्रिय हाेत्या.
दीक्षाभूमीवरील धम्मदीक्षा साेहळ्यात या गीतांना आजही माेठी मागणी असते. गायनातून लाेकप्रियतेचा शिखर पाहिलेल्या किरण पाटणकरांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा मधुर आवाज हरपल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी दिली आहे.
लढविली हाेती लाेकसभेची निवडणूक
किरण पाटणकर या त्यांच्या वार्डातून बहुजन समाज पक्षाकडून नगरसेविका हाेत्या. २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी रामटेक मतदार संघातून अनुक्रमे बसपा आणि वंचित बहुजन आघाडीकडून लाेकसभेची निवडणूकही लढविली हाेती.