‘मेट्रो’तील हुल्लडबाजीमुळे किन्नरांचीदेखील बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:57 IST2021-02-05T04:57:16+5:302021-02-05T04:57:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘मेट्रो’मध्ये ‘सेलिब्रेशन ऑन व्हिल्स’मध्ये झालेल्या हुल्लडबाजीच्या प्रकरणाचे राजकारण तापले असताना आता किन्नर संस्थेनेदेखील त्यात ...

‘मेट्रो’तील हुल्लडबाजीमुळे किन्नरांचीदेखील बदनामी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘मेट्रो’मध्ये ‘सेलिब्रेशन ऑन व्हिल्स’मध्ये झालेल्या हुल्लडबाजीच्या प्रकरणाचे राजकारण तापले असताना आता किन्नर संस्थेनेदेखील त्यात उडी घेतली आहे. आमची दिशाभूल करून आयोजकांनी आम्हाला नाचायला लावले. संबंधित प्रकार अतिशय घृणास्पद असून, यामुळे आमचीदेखील बदनामी झाली आहे. ज्यांनी हा प्रकार घडवून आणला त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य किन्नर विकास महामंडळ सदस्य आणि किन्नर विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष राणी ढवळे, उपाध्यक्ष पूजा वर्मा व सचिव राशी कोचे यांनी हे पत्र जारी केले. आयोजकांनी आम्हाला फोन केला व मित्राचा वाढदिवस आहे असे सांगून आम्हाला ‘मेट्रो’मध्ये बोलविले. आम्ही आशीर्वाद देण्यासाठी गेलो असता आम्हाला नाच करायला लावला. आम्ही आपले काम केले व मोबदला घेऊन परत आलो. मात्र त्याचे ‘व्हिडिओ शुटिंग’ करून ‘सोशल मीडिया’वर व्हायरल करण्यात आले. हे सगळे मेट्रोला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे आमच्या नंतर लक्षात आले. या प्रकारामुळे ‘मेट्रो’च नाही तर नागपूर शहराचीदेखील बदनामी झाली. शिवाय आमच्या किन्नर समाजालादेखील बदनामीचा डाग लागला. आम्हाला पूर्वकल्पना असती तर आम्ही अशा कार्यक्रमात सहभागी झालोच नसतो, असे संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले. या गैरप्रकाराशी आमचा कुठलाही संबंध नसून आम्ही रोजगाराशी संबंधित कामच केले. मात्र ज्यांनी हा प्रकार घडवून आणला त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी भूमिकादेखील मांडण्यात आली.