३७ लाखांची रोकड पळविण्यासाठी केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 11:36 PM2021-06-22T23:36:14+5:302021-06-22T23:36:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - फार्म हाऊसमध्ये ठेवलेली रोकड पळविण्यासाठी दोन तरुणांनी शेतातील रखवालदाराची हत्या केली. तेथून ३७ लाख ...

Killed for stealing Rs 37 lakh cash | ३७ लाखांची रोकड पळविण्यासाठी केली हत्या

३७ लाखांची रोकड पळविण्यासाठी केली हत्या

Next
ठळक मुद्देकुही मांगली शेत शिवारातील घटना - पोलिसांनी लावला २४ तासात छडा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - फार्म हाऊसमध्ये ठेवलेली रोकड पळविण्यासाठी दोन तरुणांनी शेतातील रखवालदाराची हत्या केली. तेथून ३७ लाख रुपये चोरून नेले. मात्र, नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने या हत्याकांडाचा छडा लावून दोन आरोपींच्या अवघ्या २४ तासात मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून ३७ लाखांची रोकडही जप्त केली. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एका पत्रकार परिषदेत या संबंधीची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल माकणिकर आणि गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल जिट्टावार हजर होते.

नागपुरात वकिली करणारे ज्ञानेश्वर फुले (रा. पंचशीलनगर)यांचे कुही जवळच्या मांगली शिवारात शेत आहे. २० जूनला फुले शेतात गेले तेव्हा त्यांना शेतात रखवाली करणारा नरेश दशरथ करुडकर (वय ३७, रा. फेगड, कुही) रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. या घटनेची माहिती त्यांनी कुही पोलिसांना कळविली. करुडकरची हत्या झाल्याचे लक्षात येताच कुही पोलिसांनी गुन्हे शाखेला कळविले. त्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला,गुन्हे शाखेचे अनिल जिट्टावार मोठा ताफा घेऊन तेथे पोहचले. प्राथमिक चाैकशीत आरोपी अविनाश शंकर नरुले (वय २४, रा. फेगड) याला काही दिवसांपूर्वी कामावरून काढून टाकल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क केला असता तो बंद दिसला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. धावपळ करून पोलिसांनी नरुलेला ताब्यात घेतले. त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करताच त्याने ही हत्या राकेश गणभिज महाजन याच्या मदतीने केल्याचे कबूल केले. ही हत्या केल्यानंतर फार्महाऊसमध्ये ठेवलेले ३७ लाख, २० हजार, ५०० रुपये चोरून आरोपींनी घराच्या टेरेसवर दोन पेट्यात दडवून ठेवले होते. ही रोकडही पोलिसांनी जप्त केली.

आधी खाणेपिणे केले नंतर हत्या केली

फुले यांच्या शेतातील घरात २० ते ३० लाखांची रोकड आहे. करुडकरची हत्या केल्यास ही रोकड आपल्याला मिळवता येईल, असे वाटल्याने त्याची आरोपींनी हत्या केली. तत्पूर्वी त्याच्याकडून १५०० रुपये घेऊन आरोपींनी दारू घेऊन खाणेपिणे केले आणि १७ जूनच्या रात्री त्याची हत्या केली.

५० हजारांची तक्रार

हत्या झाल्यानंतर रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने या प्रकरणात आधी ५० हजारांचीच रक्कम चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद केले होते, असे समजते. आता मात्र आरोपींकडून पोलिसांनी ३७, २० लाख जप्त केले. अवघ्या २४ तासात या हत्याकांडाचा छडा लावण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त अधीक्षक राहुल माकणिकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल जिट्टावार, कुहीचे ठाणेदार चंद्रकांत मदने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावली.

Web Title: Killed for stealing Rs 37 lakh cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.