Kidnapping of youth on suspicion of immoral relations | अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचे अपहरण

अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचे अपहरण

ठळक मुद्देघरी नेऊन बेदम मारहाण : सक्करदऱ्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनैतिक संबंधाच्या संशयावरून दोघांनी एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ९.१० वाजता ही घटना घडली.
राहुल अरुणराव डिकोंडवार (वय ३५) हे कोठी रोडवरील सुयोग भगवंत अपार्टमेंटमध्ये राहतात. शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास ते सक्करदरा हद्दीत न्यू सुभेदार ले-आऊटमधील माटे वाईन शॉपजवळ बसून होते. तेवढ्यात आरोपी नीलेश खंगार आणि सचिन नवघरे डस्टर गाडीने तेथे आले. त्यांनी एका महिलेच्या संबंधाने राहुलला विचारणा करून त्याच्याशी वाद घातला. खरे-खोटे करण्यासाठी त्याला सोबत घरी चलण्यास सांगितले. राहुलने नकार दिला असता आरोपींनी त्याला जबरदस्तीने गाडीत कोंबले आणि घरी नेऊन बेदम मारहाण केली. तेथे राहुलवर अनैतिक संबंधाचे आरोप लावले. आरोपींच्या तावडीतून सुटल्यानंतर राहुलने सक्करदरा ठाण्यात तक्रार नोंदवली. एएसआय पवार यांनी अपहरण करून मारहाण केल्याच्या आरोपावरून खंगार आणि नवघरेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मित्रच बनले शत्रू
पोलिसांच्या माहितीनुसार राहुल आणि आरोपी महाविद्यालयीन जीवनापासून एकमेकांचे खास मित्र होते; नंतर त्यांनी सोबतच एकाच खासगी कंपनीत नोकरी धरली. मात्र, अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्यांच्यात वैमनस्य आले असून, ते आता एकमेकांचे शत्रू झाल्याचे शुक्रवारच्या घटनेवरून उघड झाल्याचे सक्करदरा पोलीस सांगतात.

Web Title: Kidnapping of youth on suspicion of immoral relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.