विद्यार्थ्याच्या समयसूचकतेने फसला अपहरणाचा प्रयत्न!

By योगेश पांडे | Published: May 2, 2024 01:21 PM2024-05-02T13:21:47+5:302024-05-02T13:24:34+5:30

Nagpur : कारमधून आले होते आरोपी

Kidnapping attempt foiled by student's presence of mind! | विद्यार्थ्याच्या समयसूचकतेने फसला अपहरणाचा प्रयत्न!

Kidnapping failed due to Student's Alertness

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
कोचिंग क्लासला चाललेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याला सकाळी सात वाजताच्या सुमारास पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र विद्यार्थ्याच्या समससूचकतेमुळे अपहरण टळले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

३० एप्रिल रोजी सकाळी सात वाजता १७ वर्षीय विद्यार्थी कोचिंग क्लासला जाण्यासाठी मित्राची प्रतिक्षा करत होता. त्याचा मित्र दुचाकीने पोहोचल्याने विद्यार्थी खाली उतरला. त्यावेळी खाली एमएच ३१ एफआर ९३९४ या क्रमांकाची कार उभी होती. त्यात एक चालक व तीन व्यक्ती बसले होते. त्यांनी विद्यार्थ्याला आवाज देत कारमध्ये बसण्यास सांगितले. विद्यार्थ्याने मनाई केली असता तुझ्यासोबत महत्त्वाचे बोलायचे आहे असे आरोपी म्हणाले. मी तुम्हाला ओळखत नाही असे विद्यार्थ्याने म्हटले असता आरोपी बसण्याची जिद्दच करू लागले. विद्यार्थ्याला संशय आल्याने त्याने घराच्या गॅलरीत उभ्या असलेल्या बहिणीकडे पाहत वडिलांना बोलविण्यास सांगितले. त्याचे वडील येत असल्याचे पाहून कारमधील आरोपींनी धूम ठोकली. विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये कारचा फोटो काढला. हा प्रकार गंभीर असल्याने पालकांसोबत तो नंदनवन पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी कारमधील आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. कारच्या क्रमांकावरून तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी प्रज्वल उद्धव सहारे (२३, भेंडे ले आऊट) व निरज गोपाल बिहाने (२९, आस्था अपार्टमेंट, हजारीपहाड) यांना अटक केली आहे. इतरांचा शोध सुरू आहे.

आरोपींचा दावा, दारुच्या नशेत झाला प्रकार
यासंदर्भात पोलिसांनी प्रज्वल व निरज यांची चौकशी केली असता त्यांनी अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर दारुच्या नशेत हा प्रकार झाला असल्याचा दावा केला. पोलिसांकडून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.

 

Web Title: Kidnapping attempt foiled by student's presence of mind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.