अनैतिक संबंधातून झाली खोसलांची हत्या : ‘सुपारी किलिंग’चा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 10:24 PM2019-08-22T22:24:29+5:302019-08-22T22:27:34+5:30

कूलर व्यावसायिक ऋषी ब्रीज खोसला (वय ४७) यांची बुधवारी मध्यरात्री झालेली निर्घृण हत्या अनैतिक संबंधामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Khosla murdered in an immoral relationship: Suspected 'Supari' | अनैतिक संबंधातून झाली खोसलांची हत्या : ‘सुपारी किलिंग’चा संशय

अनैतिक संबंधातून झाली खोसलांची हत्या : ‘सुपारी किलिंग’चा संशय

Next
ठळक मुद्देकुख्यात मिक्की बक्षीसह दोघांना अटक : आरोपींची संख्या वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कूलर व्यावसायिक ऋषी ब्रीज खोसला (वय ४७) यांची बुधवारी मध्यरात्री झालेली निर्घृण हत्या अनैतिक संबंधामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कुख्यात गुंड रुपवेंदर ऊर्फ मिक्की बक्षी याने आपल्या साथीदारांच्या मदतीने हे थरारक हत्याकांड घडवून आणल्याचे उजेडात आले असून, हत्याकांडात अनेक सराईत गुंडांचा सहभाग आहे. कुख्यात बुकी, मॅच फिक्सर सुनील भाटिया याचेही नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सुपारी देऊन खोसलाचा गेम करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुख्यात मिक्कीच्या पत्नी (मधू)सोबत खोसलाचे अनेक वर्षांपासून मधूर संबंध होते. तीन वर्षांपूर्वी त्याची कुणकुण लागल्यानंतर मिक्की आणि खोसलात धुसफूस सुरू झाली. त्यात भाटियानेही उडी घेतली होती. हे प्रकरण खतरनाक वळणावर जाणार याची कल्पना आल्यामुळे तिघांच्याही आप्तस्वकियांनी आपसात समेट व्हावा म्हणून बरेचसे प्रयत्न केले होते. मात्र, त्यात कुणालाही यश आले नाही. खोसला-मधू दरम्यानचे मधूर संबंध अधिकच मधूर झाले अन् खोसलासोबत मिक्कीच्या संबंधातील कटुताही वाढत गेली.
सूत्रांच्या माहितीनुसार, खोसला यांचा मुलगा कॅनडात शिकतो. काही दिवसांपूर्वीच तो सुटीवर कुटुंबात परतला. बुधवारी मुलगा आणि काका शिर्डीहून दर्शन करून परतले. बैरामजी टाऊनमध्ये राहणाऱ्या खोसलांनी रात्रीच्या वेळी पत्नीला जेवण वाढण्यास सांगितले. तेवढ्यात त्यांना मधूचा फोन आला. मधूने कडबी चौकाजवळ कार पंक्चर झाल्याचे सांगितल्यामुळे पत्नीला पाच मिनिटात परत येतो, असे सांगून खोसला बाहेर पडले. तिला तिच्या कमाल चौकाजवळच्या घरी पोहचवल्यानंतर खोसला बाहेर निघाले. तेथूनच आरोपी मिक्की आणि त्याचे गुंड साथीदार खोसलांचा पाठलाग करू लागले. त्यांनी कडबी चौकाजवळ सिनेस्टाईल मागून पुढून कारला धडक मारून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. एका ऑटोनेही कट मारला. त्यामुळे खोसला ऑटोचालकावर रागावले. यावेळी मधूचा खोसलांना फोन आला. आरडाओरड ऐकून मधूने काय झाले, अशी विचारणा केली असता खोसलाने ऑटोचालकासोबत वाद झाल्याचे सांगितले. दरम्यान, खोसला गोंडवाना चौकाकडे निघाले. हत्येचा कट रचून तयारीत निघालेल्या गुंडांनी गोंडवाना ते नेल्सन चौकादरम्यान खोसलांच्या कारसमोर ऑटो आडवा केला.
त्यांनी कार थांबवताच आरोपींनी खोसलांना कारमधून खेचून त्यांच्या गळयावर धारदार शस्त्राचे घाव घालून ठार मारले. त्यानंतर त्यांची कार पीबी ०८/ एएक्स ०९०९ आरोपींनी ताब्यात घेऊन ती सदरमधील हॉटेल एलबीजवळ सोडली अन् मागून येणा-या ऑटोत बसून आरोपी पळून गेले. त्यानंतर छावणी चौकात दोन तर शबाना बेकरीजवळ एक शस्त्र फेकून आरोपी पळून गेले. दरम्यान, पत्नी तसेच खोसलांची प्रेयसी त्यांच्या मोबाईलवर वारंवार फोन करू लागली. तिकडे सदर पोलिसांना माहिती कळाली. त्यांनी घटनास्थळी पोहचून खोसलाच्या नातेवाईकांना कळविले. खोसलाचे हत्याकांड मिक्की बक्षीनेच घडवून आणल्याचा आरोप झाल्याने पोलिसांनी त्याला आणि दासरवारला रात्रीच ताब्यात घेतले. काही तासातच मिक्कीने हत्याकांडाची कबुली दिल्याचे समजते.

एक कोटींची सुपारी ?
खोसला यांच्या हत्याकांडात ५ ते ७ सराईत गुन्हेगारांचा सहभाग असल्याचा संशय आहे. कुख्यात गुंड मिक्की बक्षी आणि गिरीश दासरवार तसेच बबन कळमकर यांची नावे उघड झाल्याचे पोलीस सांगत आहेत. मिक्कीवर अपहरण, हत्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पाच ते सात वर्षांपूर्वी तो यूथ फोर्स नावाने सिक्युरिटी गार्डची एजन्सी चालवायचा. या एजन्सीत त्याने गुंडाची भरती करून अनेक तरुणांना गुन्हेगारीत ढकलले होते. राष्टवादी काँग्रेसचे नेते गणेश मते यांचे साथीदारांच्या मदतीने अपहरण करून मिक्कीने त्यांची हत्या केल्याचा आरोप होता. अनेकांच्या जमिनी, भूखंड बळकावून त्याने कोट्यवधींची मालमत्ता जमविली आहे.
गिरिशही कुख्यात आहे. त्याच्यावर नंदनवन आणि खापरखेडा पोलीस ठाण्यात हत्येचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याला मिक्कीने नागपुरातील खोसलाच्या एका प्रॉपर्टीतील भागीदारी आणि एक कोटीची सुपारी देऊन साथीदारांसह सहभागी करून घेतल्याची चर्चा आहे. पोलिसांनी या दोघांना रात्रीच ताब्यात घेतले. त्यांना आज न्यायालयात हजर करून त्यांचा २५ ऑगस्टपर्यंत पीसीआर मिळवला. त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

दीड वर्षांपासून प्रयत्न, फिक्सरचेही डील ?
ऋषी खोसला, मिक्की बक्षी आणि कुख्यात बुकी, मॅच फिक्सर सुनील भाटिया या तिघांची १५ वर्षांपूर्वी घनिष्ट मैत्री होती. त्यावेळी खोसलाच्या मध्यस्थीतूनच सुनीलची बहीण मधुसोबत मिक्कीचे लग्न जुळले होते. लग्नाच्या काही वर्षांनंतर मिक्की अपहरण आणि हत्याकांडाच्या आरोपात कारागृहात पोहचला आणि मधु तसेच खोसलात मधूर संबंध निर्माण झाले. मिक्की कारागृहातून बाहेर आला अन् पत्नीने त्याच्यासोबतचे आपले लग्न तोडले. त्यामुळे मिक्की त्याच्या मुलासह राजनगरात तर पत्नी मधु कमाल चौकात राहू लागली. तत्पूर्वीच मधु अन् खोसलाचे प्रेमसंबंध लक्षात आल्याने सुनीलने खोसलाला मधुपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. तो ऐकत नसल्याचे पाहून दोन मित्रांमध्ये वैर निर्माण झाले. सुनीलने खोसलाच्या पत्नीला ‘तुझे कुंकू पुसून टाक’ असेही रागारागाने म्हटले होते, असे आता बोलले जात आहे.
इकडे मिक्कीही खोसलाचा घोसला उद्ध्वस्त करण्याच्या मागावर होता. दीड वर्षांपूर्वी विमानतळ मार्गावर खोसलाच्या कारला भरधाव ट्रकने धडक मारली होती. त्यात कारची मोठी तोडफोड झाली होती मात्र गंभीर जखमी झालेले खोसला अपघातातून बचावले होते. तो अपघात नव्हता तर खोसलाच्या हत्येचा प्रयत्न होता, असा अंदाज नंतर अनेकांनी काढला होता. अखेर मिक्कीने खोसलाचा गेम करवून घेतलाच.

Web Title: Khosla murdered in an immoral relationship: Suspected 'Supari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.