नागपूर कारागृहात पैसे घेऊन गांजा पुरविण्याचे ‘खाकी’चे रॅकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2022 08:15 IST2022-12-01T08:15:00+5:302022-12-01T08:15:01+5:30
Nagpur News नागपूर मध्यवर्ती कारागृहात पैसे घेऊन गांजा पुरविण्याच्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या रॅकेटमध्ये कारागृहातीलच दोन कर्मचारी समाविष्ट होते.

नागपूर कारागृहात पैसे घेऊन गांजा पुरविण्याचे ‘खाकी’चे रॅकेट
योगेश पांडे
नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात पैसे घेऊन गांजा पुरविण्याच्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या रॅकेटमध्ये कारागृहातीलच दोन कर्मचारी समाविष्ट होते. त्यांच्यासह कैद्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करत त्यांना अटक करण्यात आली आहे. अजिंक्य राठोड व प्रशांत राठोड अशी कर्मचाऱ्यांची नावे असून निषिद वासनिक, वैभव तांडेकर, श्रीकांत थोरात, गोपाळ पराते व राहुल मेंढेकर हे कैदी यात सहभागी होते. यातील कर्मचारी, श्रीकांत, गोपाळ व राहुल यांना अटक करण्यात आली आहे.
निषिद व वैभव हे या रॅकेटचे सूत्रधार होते. निषिद हा कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात आत आहे. मागील दोन वर्षांपासून ते तुरुंगात आहेत. त्यांनी त्यांच्या रॅकेटसाठी अजिंक्य व प्रशांत राठोड यांना हाताशी धरले होते. दोघेही त्यांना त्यांच्यासाठी व इतर कैद्यांसाठी बाहेरून गांजा, खाद्यपदार्थ, कपडे, पैसे आणायला सांगायचे. कारागृहातील हे कर्मचारी काही दिवसां्गोदरच सुटका झालेले गुन्हेगार श्रीकांत, गोपाल व राहुल यांना संबंधित सामान आणायला सांगायचे. गेल्या अनेक दिवसांपासून हे रॅकेट सुरू होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मंगळवारी या रॅकेटची टीप मिळाली. त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेचे पथक व सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला. तुरुंगातून एक सीम कार्ड ऑपरेट होत होते अशी माहिती यातून समोर आली. पोलिसांनी संबंधित कॉलर्सची चौकशी केली व व्हॉट्सअपदेखील तपासले असता त्यातून हा भंडाफोड झाला. धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हेगारी कट, फसवणूक, बनावट कागदपत्रे बनवणे अशा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
सामानांचे ठरले होते ‘रेटकार्ड’
मागील एका महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार बाहेरून तुरुंगात सामान आणायचे ‘रेटकार्ड’देखील ठरले होते. गांजा आणायचे पाच हजार, खाद्यपदार्थांचे दोन ते तीन हजार तर कपडे व स्वेटर आणण्यासाठी हजार रुपये घेतल्या जायचे.
तुरुंगात परत मोबाईल
कारागृहात गांजा आढळल्यानंतर पोलिसांनी सखोल झडती घेतली होती. त्यादरम्यान मोबाईल वापरण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर परत कारागृहात मोबाईल जाणे ही चिंताजनक बाब आहे. कारागृहातून सीमकार्ड ऑपरेट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र पोलिसांना मोबाईल मात्र सापडला नाही.
साक्षीदारांनादेखील धमक्या
नागपूर कारागृहात बंद असलेले बहुतांश बडे गुन्हेगार या रॅकेटमध्ये सामील आहेत. अंमली पदार्थ आणि चैनीच्या वस्तू मागवण्याबरोबरच ते पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील साक्षीदारांना धमकावत असे. व्हॉट्सअपच्या तपासात असे अनेक मॅसेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही. यात काही अधिकारीदेखील सहभागी आहेत का याचा शोध सुरू आहे.