नागपूर की खड्डापूर!
By Admin | Updated: August 5, 2015 02:33 IST2015-08-05T02:33:49+5:302015-08-05T02:33:49+5:30
मे महिन्यात शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण झाल्याने नागरिकांनी कौतुक केले होते. परंतु जून महिन्यातील पहिल्याच पावसाने नागपुरातील रस्त्यांची पोल खोलली.

नागपूर की खड्डापूर!
पावसात मारताहेत पॅचेस : खड्ड्यामुळे लोकांचा जीव धोक्यात
लोकमत जागर
नागपूर: मे महिन्यात शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण झाल्याने नागरिकांनी कौतुक केले होते. परंतु जून महिन्यातील पहिल्याच पावसाने नागपुरातील रस्त्यांची पोल खोलली. दुरुस्ती झालेल्या शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले. त्यानंतर पावसाने उसंत घेतली. या कालावधीत शहरातील खड्डे बुजवले जातील, अशी अपेक्षा होती. काही ठिकाणी पॅचेस मारण्यात आले. परंतु काही दिवसातच यातील गिट्टी बाहेर आली. शहरातील व्हीआयपी मार्ग व सिव्हील लाईन भागातील रस्ते सोडले तर बहुसंख्य रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे ‘नागपूर की खड्डापूर’ असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
लोकमत चमूने मंगळवारी शहरातील रस्त्यांची पाहणी केली. तेव्हा काही अपवाद वगळता बहुसंख्य रस्त्यांवर खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. एकदा केलेले डांबरीकरण लगेच हलक्या पावसाने कसे उखडते, या कामांमध्ये भ्रष्टाचार तर झाला नाही ना, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. त्यातच दोन दिवसापासून शहरात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खड्ड्यात पुन्हा भर पडल्याने वाहन चालकांचा जीव धोक्यात आला आहे.(प्रतिनिधी)
वस्तीतील अंतर्गत रस्तेही खराब
शहरातील मुख्य रस्त्यापेक्षा वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांची स्थिती वाईट आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पावसाने उघाड दिल्यानंतर खड्डे बुजवण्याचे काम सुरू होईल. परंतु पावसामुळे पुन्हा खड्डे पडतील. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यातही लोकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे.
शहरातील नागरिक व्हीआयपी नाही का?
मुख्यमंत्री, केंद्र व राज्याचे मंत्री यांच्यासारखे व्हीआयपी शहरातील विशिष्ट मार्गावरून ये-जा करतात. अशा मार्गाची स्थिती चांगली आहे. परंतु शहरातील इतर मार्गाची अवस्था बिकट आहे. प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीने शहरातील नागरिक व्हीआयपी नाही का, चांगल्या रस्त्यांवरून फिरण्याचा त्यांना हक्क नाही का, असे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.
डांबरीकरण उखडले त्याचे काय ?
दीड -दोन महिन्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेल्या काही रस्त्यांवर खड्डे नाहीत मात्र पावसामुळे डांबरीकरण पूर्ण उखडले आहे. त्यामुळे रस्त्यावर दगडकणांचा थर साचला आहे. यावरून दुचाकी वाहने घसरत आहेत.दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून खड्डे भरले जातात. मात्र, पुढच्या वर्षी पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडतात. यावरून खड्डे भरण्याच्या कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.