चौकशी सोडण्यासाठी खरबडे हायकोर्टात
By Admin | Updated: August 3, 2015 03:00 IST2015-08-03T03:00:53+5:302015-08-03T03:00:53+5:30
डॉ. सुरेंद्र खरबडे यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रोखे घोटाळ्याच्या चौकशीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

चौकशी सोडण्यासाठी खरबडे हायकोर्टात
‘एनडीसीसी’ बँक घोटाळा : राजकीय दबाव असल्याची माहिती
नागपूर : डॉ. सुरेंद्र खरबडे यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रोखे घोटाळ्याच्या चौकशीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिवाणी अर्ज दाखल केला असून त्यावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. डॉ. खरबडे चौकशी सोडणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वीच प्रकाशित केले होते.
खरबडे यांनी यासंदर्भात १५ जुलै रोजी विभागीय सहकार सहनिबंधकांना पत्र पाठविल्याचे कळले आहे. बँकेतील सुमारे १४९ कोटी रुपयांच्या रोखे घोटाळ्याची महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा-१९६० मधील कलम ८८ अंतर्गत फेरचौकशी करण्यात येत आहे. घोटाळ्यातील आरोपींमध्ये बँकेचे माजी अध्यक्ष आमदार सुनील केदार, माजी महाव्यवस्थापक अशोक चौधरी (नागपूर), रोखे दलाल संजय अग्रवाल, केतन सेठ, सुबोध भंडारी, कानन मेवावाला, नंदकिशोर त्रिवेदी (सर्व मुंबई), अमित वर्मा (अहमदाबाद), महेंद्र अग्रवाल, श्रीप्रकाश पोद्दार (कोलकाता) आदींचा समावेश आहे.
सुरुवातीला यशवंत बागडे यांनी घोटाळ्याची चौकशी केली होती. त्यांनी केदार व इतर आरोपींवर १३ पैकी ५ आरोप सिद्ध होत असल्याचा अहवाल दिला होता. याविरुद्ध केदार यांनी सहकारमंत्र्यांकडे अपील केले होते. १४ जून १०१४ रोजी सहकारमंत्र्यांनी अपील मंजूर करून प्रकरण फेरचौकशी करण्यासाठी परत पाठविले होते.
त्यानुसार १६ जून २०१४ रोजी खरबडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. खरबडे यांनी चौकशीला सुरुवात केली पण, आरोपी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चौकशीला विलंब करीत आहेत. खरबडे यांना दूरध्वनीवरून धमक्या दिल्या जात आहेत. लाच देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच, चौकशीसाठी येणाऱ्या खर्चाची परतफेड शासनाकडून वेळेवर केली जात नसल्याचे कळले आहे. आरोपींकडून सतत त्रास देण्यात येत असल्यामुळे खरबडे मानसिक तणावात आले आहेत.
त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होत आहे. परिणामी त्यांनी चौकशीच्या जबाबदारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी मोबाईलवरून संपर्क साधला असता खरबडे यांनी कॉल स्वीकारला नाही.(प्रतिनिधी)