‘हा’ काेंडवाडा आहे की ‘गाेडाऊन’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:27 IST2020-12-15T04:27:27+5:302020-12-15T04:27:27+5:30
बेसूर : उपद्रवी गुरांचा बंदाेबस्त करण्यासाठी तसेच मालकांनी त्या गुरांचा व्यवस्थित सांभाळ करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर काेंडवाड्याची निर्मिती करण्यात आली. हे ...

‘हा’ काेंडवाडा आहे की ‘गाेडाऊन’?
बेसूर : उपद्रवी गुरांचा बंदाेबस्त करण्यासाठी तसेच मालकांनी त्या गुरांचा व्यवस्थित सांभाळ करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर काेंडवाड्याची निर्मिती करण्यात आली. हे काेंडवाडे ग्रामपंचायतींचे उत्पन्नाचे साधनही हाेते. बेसूर (ता. भिवापूर) येथील काेंडवाड्याची अवस्था चांगली असून, या काेंडवाड्यात कंत्राटदाराने बांधकाम साहित्य ठेवल्याने तिथे गुरांना काेंडण्याची समस्या ऐरणीवर आली आहे.
सध्या बेसूर येथे ॲलाेपॅथी दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून, कंत्राटदाराने बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी त्या काेंडवाड्यावा वापर केला आहे. त्यातच तीन दिवसापूर्वी प्रमाेद कुबळे या शेतकऱ्याने त्यांच्या पिकाचे नुकसान करणाऱ्या जनावरांना पकडून ती काेंडण्यासाठी काेंडवाड्यात आणली हाेती. परंतु ग्रामपंचायतच्या शिपायाने ती काेंडण्यास नकार दिला. चाैकशीअंती सरपंचाचा आदेश असल्याची माहिती त्या शिपायाने दिली.
कंत्राटदाराने या काेंडवाड्यात सळाकी, सिमेंटची पाेती, फावडे, घमेले यासह अन्य साहित्य ठेवले आहे. भिंतीच्या खुंटीला कामगारांचे कपडे लटकविले असल्याचेही आढळून आले. जवळच पिण्याच्या पाण्याची टाकी असून, त्या टाकीच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही ग्रामपंचायतकडेच आहे. कंत्राटदाराने त्या टाकीजवळ रेतीचे ढीग टाकले आहे. त्यामुळे टाकीच्या परिसरात चिखल व घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. पुढे या ठिकाणी डासांची पैदास हाेऊन नागरिकांच्या आराेग्याला धाेका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंत्राटदार ग्रामपंचायत कार्यालयातील विजेचा वापर करीत असल्याचेही जाणकार व्यक्तींनी सांगितले.
...
उत्पन्नाचे साधन
काेंडवाडे हे ग्रामपंचायतच्या आर्थिक उत्पन्नाच्या साधनांपैकी एक हाेय. उपद्रवी गुरांना यात काेंडल्यानंतर ती गुरे साेडण्यासाठी ग्रामपंचायत गुरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करतात. दंडाच्या रकमेचा भरणा केल्यानंतर ती गुरे साेडली जातात. ऑगस्ट २०२० मध्ये बेसूर येथील काेंडवाड्यात चार म्हशी काेंडल्या हाेत्या. त्या म्हशींच्या मालकाचा शाेधूनही पत्ता न मिळाल्याने शेवटी त्या म्हशींचा २६ ऑगस्ट राेजी लिलाव करण्यात आला. यातून ग्रामपंचायतला १ लाख २४ हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले हाेते.
....
कंत्राटदाराला काेंडवाडा बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी देणे, कार्यालयातील विजेचा वापर करणे तसेच पाण्याच्या टाकीजवळील रेतीचे ढीग याबाबत आपल्याला माहीत नाही. या प्रकाराची पाहणी करून चाैकशी केली जाईल.
- डी. एस. वासे, सचिव,
ग्रामपंचायत, बेसूर.