स्टार बसेस चकाचक ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2016 05:33 IST2016-04-05T05:33:25+5:302016-04-05T05:33:25+5:30
शहरातील नागरिकांना चांगली प्रवासी सेवा उपलब्ध करण्यासाठी स्टार बससेवा अधिक सक्षम व दर्जेदार करा सोबतच सर्व

स्टार बसेस चकाचक ठेवा
नागपूर : शहरातील नागरिकांना चांगली प्रवासी सेवा उपलब्ध करण्यासाठी स्टार बससेवा अधिक सक्षम व दर्जेदार करा सोबतच सर्व बसेस पाण्याने धुवून चकाचक ठेवा, असे निर्देश महापालिकेच्या परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी सोमवारी समितीचे पदाधिकारी, कंत्राटदार व परिवहन विभागाचे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत दिले.
दररोज ४० बसेस धुतल्या पाहिजे तसेच मोरभवन येथे काही वेळ बसेस उभ्या राहतात. या कालावधीत त्या स्वच्छ करून बसमधील कचरा बाहेर काढा, यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा. बसचालकांना वाहतूक नियामांचे ज्ञान असावे. प्रवाशांना सौजन्याची वागणूक मिळावी. यासाठी चालक व वाहकांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात यावे. महिला व विद्यार्थिंनींना प्रवासादरम्यान त्रास होऊ नये यासाठी बसफेऱ्याचा आढावा घेऊ न पुढील शैक्षणिक सत्रापासून जादा बसेस सोडण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बसथांबा असलेल्या ठिकाणी बसफेऱ्यांचे वेळापत्रक लावण्याचे निर्देश व्हीएनआयएल यांना देण्यात आले. तत्कालीत महापौर अर्चना डेहनकर यांच्या कार्यकाळात महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करण्यात आली होती. परंतु लवकरच ही सेवा बंद करण्यात आली. यासंदर्भात अहवाल सादर करा. बसथांबा असेल त्याच ठिकाणी बसेस थांबविण्यात याव्या. काही थांब्यांवर बसेस न थांबविता पुढे
जाऊ न थांबविल्या जातात. त्यामुळे थांब्याचा वापर होत नाही. महापालिका व व्हीएनआयएल अधिकाऱ्यांनी शहरातील थांब्यांचा सर्वे करून अहवाल सादर करावा. विद्यार्थ्यांची मागणी असेल तर जादा बसेस सोडण्यात याव्या. परिवहन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे, भ्रमणध्वनी क्रमांक, तक्रारनिहाय टोल फ्री क्र मांक फलकावर लावण्याचे निर्देश देण्यात आले.
अपर आयुक्त नयना गुंडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक कर्नल एस.जे. मुजुमदार, प्रमोद पुराणिक, इरशाद पठाण, संजय अलोणे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)