लोकमत न्यूज नेटवर्ककाटोल : काटोल शहरातील मुख्य रस्ता सिमेंटचा होणार होता, मात्र गेल्या चार महिन्यांपासून हे काम अर्ध्यावर येऊन थांबले असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाच्या निधीअभावी कंत्राटदाराने हे काम थांबविल्याची माहिती आहे. लोकप्रतिनिधींनी तातडीने निधीची मागणी करून अडथळा दूर करण्याची मागणी होत आहे.
काटोल शहरातून नागपूरकडे जाणारा गळपुरा ते उड्डाणपूल दरम्यानचा हा मुख्य रस्ता अतिशय खराब झाल्याने या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याचे काम सुरू झाले. अनेक अडचणीनंतर या कामाला हिरवा कंदील मिळाला. एका भागातील काम पूर्णही झाले. तब्बल ३२ कोटी रुपयांचा हा सिमेंट रस्ता शहरातील अतिशय वर्दळीचा मार्ग मानला जातो. काटोल शहरातील सुमारे २० हजार नागरिकांची दैनंदिन वर्दळ या मार्गावरूनच होते. मात्र, रस्ता तयार होत असतानाच हे काम अर्ध्यावर थांबविण्यात आले.
रस्ता कामादरम्यान इतर भागांमध्ये जागोजागी मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना वाहतूक करणे अवघड झाले आहे. या रस्त्याच्या माध्यमातून शहरातील विविध भागांत जाणाऱ्या जोडरस्त्यांवरूनही वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
माहिती घेतली असता कंत्राटदाराने काम सुरू करून अर्ध्याहून अधिक काम केले, मात्र त्याला नाममात्रच पैसे देण्यात आल्याने त्याने काम थांबविल्याचे स्पष्ट झाले आहे. शासन स्तरावर अडकलेल्या निधीमुळेच हे काम बंद असल्याची माहिती समोर आली आहे.
माहिती घेतली असता कंत्राटदाराने काम सुरू करून अर्ध्याहून अधिक काम केले, मात्र त्याला नाममात्रच पैसे देण्यात आल्याने त्याने काम थांबविल्याचे स्पष्ट झाले आहे. शासन स्तरावर अडकलेल्या निधीमुळेच हे काम बंद असल्याची माहिती समोर आली आहे.
अशी आहे जुनी पार्श्वभूमीपूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र, काही कारणास्तव विद्यमान आमदार व नगरपरिषदेचे तत्कालीन सत्तापक्ष गटनेते चरणसिंग ठाकूर यांनी तो पालिकेकडे हस्तांतरित करून घेतला. या रस्त्याचे सिमेंटीकरण करून कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी तब्बल ३२ कोटी रुपयांचा निधी ठाकूर यांनीच मंजूर करून आणला आणि काम सुरू केले. आता एकदा पुढाकार घेऊन अडकलेला निधी मार्गी लावून हे काम पूर्ण करून काटोलकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.