नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुका ओल्या दुष्काळाच्या सावटात; सोयाबीन, कापूस, तूर पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 21:01 IST2022-07-19T21:01:10+5:302022-07-19T21:01:42+5:30
Nagpur News काटोल तालुक्यात सततच्या मुसळधार पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे. जेमतेम बाहेर आलेले पीक सततच्या पावसाने पाण्याखाली असून सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके उगविण्याआधीच खराब होऊ लागले आहेत.

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुका ओल्या दुष्काळाच्या सावटात; सोयाबीन, कापूस, तूर पाण्याखाली
नागपूर : काटोल तालुक्यात सततच्या मुसळधार पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे. जेमतेम बाहेर आलेले पीक सततच्या पावसाने पाण्याखाली असून अद्यापही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे आता सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके उगविण्याआधीच खराब होऊ लागले आहेत. काही भागांत शेतकऱ्यांना रोपटे बाहेर येण्याच्या अशाच सोडल्या आहेत. दुसरीकडे बागायतदार शेतीला सुद्धा मोठा फटका बसला आहे. शेतात जिकडे तिकडे पाणीच पाणी येत आहे.
जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काटोल तालुक्यात पाऊस नसल्याने शेतकरी त्रस्त होते. यानंतर दोन ते तीन वेळा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. मात्र, गत बारा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात आतापर्यंत ५२६ मि.मी.चा पाऊस झाला आहे. तालुक्याला पाणीपुरवठा करणारा रिधोरा येथील जाम प्रकल्प आव्होरफ्लो झाला आहे. चिखली नाला प्रकल्पसुद्धा ओसंडून वाहत आहे. पावसाचा जोर सुरू राहिला तर ४९ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकाच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.