जिल्ह्यात करडी, सूर्यफुलाचा पेरा शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST2021-01-08T04:22:19+5:302021-01-08T04:22:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर नागपूर : करडी व सूर्यफूल ही पारंपरिक तेलवर्गीय पिके जिल्ह्यातून हद्दपार झाली असून, भुईमुगाचा अल्प तर ...

Kardi, sunflower sowing at zero in the district | जिल्ह्यात करडी, सूर्यफुलाचा पेरा शून्यावर

जिल्ह्यात करडी, सूर्यफुलाचा पेरा शून्यावर

लोकमत न्यूज नेटवर

नागपूर : करडी व सूर्यफूल ही पारंपरिक तेलवर्गीय पिके जिल्ह्यातून हद्दपार झाली असून, भुईमुगाचा अल्प तर जवसाचा नगण्य पेरा आहे. या पिकांच्या तुलनेत जिल्ह्यातील शेतकरी साेयाबीनला महत्त्व देतात. मात्र, साेयाबीनचे लागवड क्षेत्र वाढले असतानाही उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने उत्पादन खर्च भरून निघेनासा झाला आहे. दुसरीकडे, खाद्यतेलाची मागणी व किमतीत वाढ हाेत आहे.

करडी व सूर्यफूल ही दाेन्ही पिके खादाड आहेत. त्यांना माेठ्या प्रमाणात अन्नद्रव्यांची आवश्यक असते. या दाेन्ही पिकांची उत्पादकता कमी असून, बाजारात भाव कमी मिळताे. त्यामुळे जिल्ह्यातून करडीचे पीक २५ ते ३०, तर सूर्यफुलाचे पीक १५ ते १८ वर्षांपासून हद्दपार झाले आहे. वास्तवात, सूर्यफुलाचे पीक चांगले असून, ते तिन्ही हंगामात उत्पादन घेता येते. या पिकाला पक्ष्यांपासून वाचवताना शेतकऱ्यांच्या अक्षरश: नाकीनऊ येते.

या दाेन्ही पिकांसाेबत जवसाची उत्पादकताही कमीच आहे. जिल्ह्यात अंदाजे ४० वर्षांपूर्वी जवसाचे बऱ्यापैकी पीक घेतले जायचे. सध्या या पिकाचे उत्पादन उमरेड व भिवापूर तालुक्यांत केवळ ५ ते १० हेक्टरमध्ये घेतले जाते. भुईमुगाचे उत्पादन माेठ्या प्रमाणात घेतले जायचे. भुईमुगाच्या काढणी अधिक खर्च येत असल्याने तसेच मजुरांची समस्या व पावसाचे कमी प्रमाण यामुळे भुईमुगाचे क्षेत्रही जेमतेम राहिले आहे.

तेलबियांमध्ये साेयाबीनचे माेठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. जमिनीतील बुरशी, कीड व राेगांचा प्रदुर्भाव यामुळे साेयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट येत आहे. जिल्ह्यातील साेयाबीनची उत्पादकता ही एकरी १३ ते १७ क्विंटलवरून २ ते ४ क्विंटलवर आली आहे. याला आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या बियाण्यांचा अभाव, पिकांचा फेरपालट, उत्पादन वाढवून उत्पादनखर्च कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा अभाव कारणीभूत आहे.

तेलपीक पेरणी क्षेत्रपीक

२०२० २०१९ घट वाढ (हेक्टरमध्ये)

करडी ००० ००० ००० ०००

सोयाबीन १०२३८७ १००९१२ ००० १४७५

सूर्यफूल ००० ००० ००० ०००

जवस ०४ ०३ ०१ ०००

भुईमूग १२७१ १४९२ २२२ १६००

करडी हद्दपार

करडीचे उत्पादन पूर्वी अकाेला जिल्ह्यात घेतले जायचे. सन १९९९-२००० पासून या पिकाचा अकाेला जिल्ह्यातही पेरा कमी व्हायला लागला. नागपूर जिल्ह्यात करडीचा पेरा पूर्वीही अल्पच हाेता. करडीचे पीक काटेरी असून, खादाड असल्याने त्याचे उत्पादन घेणे त्रासदायक व आर्थिकदृष्ट्या परवडण्याजाेगे नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. रब्बी हंगामात येणाऱ्या या पिकाला कमी पाण्याची गरज असताना शेतकरी करडीचे उत्पादन घेत नाही. नागपूर जिल्ह्यातून करडीचे पीक अंदाजे २५ ते ३० वर्षांपूर्वीच हद्दपार झाले आहे.

करडी, सूर्यफूल, जवस या पिकांचे क्षेत्र सलग नसते. त्यामुळे पक्ष्यांपासून हाेणाऱ्या नुकसानीचे प्रमाण वाढते. ही पिके मळणीसाठी त्रासदायक ठरतात. तुलनेत साेयाबीन व हरभऱ्याचे पीक कमी खर्चाचे व त्रासाचे आहे. तुलनेत साेयाबीन व हरभऱ्याला चांगला भाव मिळत असल्याने उत्पन्नही चांगले मिळते. शेतकऱ्यांनी या पिकाचे सलग प्लाॅट घ्यावे. पाणी असल्यास भुईमुगाचे पीक घ्यावे.

- विजय निमजे, उपविभागीय कृषी अधिकारी

एकच पीक एकाच शेतात वारंवार घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राेग व किडींचे प्रमाण वाढले आहे. जमिनीतही बुरशी तयार झाली आहे. पूर्वी पिकांचा फेरपालट केला जायचा. ही पद्धती आता कुणी अमलात आणत नाही. त्यामुळे उत्पादकता घटत चालली आहे. भाव मिळत नसल्याने शेतकरी बहुतांश पारंपरिक तेलबियांचे उत्पादन घेण्यास उत्सुक नसतात.

- दिलीप काळमेघ, शेतकरी

Web Title: Kardi, sunflower sowing at zero in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.