कोमावार यांच्याकडे प्रभारी कार्यभार
By Admin | Updated: August 27, 2014 00:57 IST2014-08-27T00:57:28+5:302014-08-27T00:57:28+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रभारी कार्यभार कोणाकडे द्यायचा यासंदर्भात प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण

कोमावार यांच्याकडे प्रभारी कार्यभार
नागपूर विद्यापीठ : १५ सप्टेंबरपर्यंत सोपविली परीक्षा नियंत्रकपदाची जबाबदारी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रभारी कार्यभार कोणाकडे द्यायचा यासंदर्भात प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. ‘बीसीयूडी’ संचालक (बोर्ड आॅफ कॉलेज अॅन्ड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेन्ट) डॉ.श्रीकांत कोमावार यांच्याकडे परीक्षा नियंत्रकपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी केवळ १५ सप्टेंबरपर्यंतच असल्याने त्यानंतर काय हा प्रश्न मात्र कायमच आहे.
विद्यापीठातील एकूण राजकारणाला कंटाळून विलास रामटेके यांनी मुंबई येथील जे.जे.स्कूल आॅफ आर्किटेक्चर येथे ‘प्रोफेसर’ म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अगोदरच निकालांच्या खोळंब्यामुळे अडचणीत सापडलेल्या परीक्षा विभागाचा प्रभारी कारभार तातडीने कोणत्या अधिकाऱ्याकडे द्यायचा यासंदर्भात पेच होता. डॉ.पूरण मेश्राम व प्रशांत मोहिते या दोघांचे नाव यासाठी आघाडीवर होते. प्रशासनाने डॉ.सिद्धार्थ काणे यांनादेखील यासाठी विचारणा केली होती. काणे यांच्याकडे परीक्षा विभागाचा अनुभवदेखील आहे परंतु काणे यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला.
अखेर ‘बीसीयूडी’ संचालक डॉ.श्रीकांत कोमावार यांच्याकडे परीक्षा नियंत्रकपदाचा प्रभारी कार्यभार देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात विद्यापीठाचे प्रसिद्धी समन्वयक श्याम धोंड यांच्याशी संपर्क साधला असला त्यांनी या घडामोडीस होकार दिला. डॉ.कोमावार यांनी मंगळवारी सायंकाळी विलास रामटेके यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. परंतु १५ सप्टेंबरनंतर कोणाकडे ही धुरा जाणार याबाबत अद्यापही काही स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, येत्या काही दिवसांतच पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक नियुक्तीसाठी प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे असेदेखील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
प्रभारी कुलगुरूंना मिळणार मुदतवाढ?
तत्कालीन कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांच्या राजीनाम्यानंतर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. दरम्यान, विद्यापीठासमोरील अडचणी, ‘नॅक’ समितीचा प्रस्तावित दौरा, शंभरावा दीक्षांत समारंभ इत्यादी बाबी लक्षात घेता अनुपकुमार यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.