कालिदास महोत्सव : परवीन सुलताना यांच्या स्वरांनी उबदार झाली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:20 AM2018-11-30T01:20:29+5:302018-11-30T01:24:39+5:30

‘हमे तुमसे प्यार कितना...’ आणि पाकीजासह अनेक चित्रपटातील गीतांच्या आठवणींचा ठेवा. या आठवणींसह जगविख्यात गायिका बेगम परवीन सुलताना यांचे स्वरमाधुर्य ऐकण्याची, सामावून घेण्याची प्रतीक्षा आधीच श्रोत्यांना लागली होती. त्यांनीही स्वरगंधाची उधळण करून श्रोत्यांना काबीज केले आणि सुरांच्या अत्युच्च शिखरावर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कालिदास महोत्सवाची सांगता झाली.

Kalidas Festival: Parine Sultan's warmth turns warm | कालिदास महोत्सव : परवीन सुलताना यांच्या स्वरांनी उबदार झाली रात्र

कालिदास महोत्सव : परवीन सुलताना यांच्या स्वरांनी उबदार झाली रात्र

googlenewsNext
ठळक मुद्देसुरांच्या अत्युच्च शिखरावर कालिदास महोत्सवाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘हमे तुमसे प्यार कितना...’ आणि पाकीजासह अनेक चित्रपटातील गीतांच्या आठवणींचा ठेवा. या आठवणींसह जगविख्यात गायिका बेगम परवीन सुलताना यांचे स्वरमाधुर्य ऐकण्याची, सामावून घेण्याची प्रतीक्षा आधीच श्रोत्यांना लागली होती. त्यांनीही स्वरगंधाची उधळण करून श्रोत्यांना काबीज केले आणि सुरांच्या अत्युच्च शिखरावर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कालिदास महोत्सवाची सांगता झाली.
शास्त्रीय संगीतासह उपशास्त्रीय ठुमरी, दादरा असे रसिले प्रकार व हिंदी सिनेमातील पार्श्वगायनासह घराघरात पोहचलेल्या या पद्मभूषण परवीन यांचा खास चाहता वर्ग सर्वदूर पसरलेला आहे. त्यामुळे बऱ्याच काळानंतर पुन्हा त्यांच्या स्वरांची गोड अनुभूती घेण्यासाठी रसिकांनी सुरेश भट सभागृहात प्रचंड गर्दी केली होती. आसाम ही जन्मभूमी व मुंबई-महाराष्ट्र ही कर्मभूमी मानणाऱ्या बेगम परवीन यांनी सुरुवातीलाच चोखंदळ रसिक अशी ओळख असलेल्या नागपूरकर रसिकांच्या प्रेमाचे आभार मानत ‘राग मारुविहाग’ने त्यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. बालवयापासून नाद व सुरांच्या उद्यानात बागडणाऱ्या परवीन सुलताना यांच्यात पतियाळा व किराणा घराण्याच्या संमिश्र स्वरांची रागिणी वाहते. तीनही सप्तकात सहज फिरणारा गाजदार स्वर, लहान-मोठ्या तानांची वर्तुळे व सरगमची उधळण त्यांनी रसिकांवर केली. विलंबित एकतालातील ‘कैसे विन साजन...’ व द्रुत तीन तालातील ‘गवन न किजो...’ या बंदिशीसह त्यांनी रागविस्तार केला. पुढे राग ‘मालुहामांड’मध्ये झपतालातील बंदिश व तीन तालातील तराणा अशांसह त्यांनी आपले गायन कळसाला पोहचविले. खास श्रोत्यांच्या आग्रहावर मिश्र तिलंग रागातील ‘रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते...’ ही मराठीतील रचना त्यांनी सादर करून बहारदार समापन केले.
त्यांना तबल्यावर मुकुंदराज देव, हार्मोनियमवर श्रीनिवास आचार्य, तानपुऱ्यावर ऋतुजा व शीतल यांनी सुरेल साथसंगत केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख निवेदन श्वेता शेलगावकर आणि रेणुका देशकर यांनी केले. ध्वनिसंयोजन संदीप बारस्कर यांचे होते.

गडकरी यांच्या संदेशाने हृदय समापन
कालिदास महोत्सवाच्या समापनाच्या औपचारिक कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे एमडी अभिमन्यू काळे, आयकर सहआयुक्त मुरारे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडीओद्वारे संदेश दिला. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलावंतांच्या सादरीकरणाने हा महोत्सव देशभर परिचित झाल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग यांनी आभार मानले.

 

Web Title: Kalidas Festival: Parine Sultan's warmth turns warm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.