कल्लू यादव गोळीबार; मास्टरमाईंडला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, शहर पोलिसांच्या ताब्यात दिले
By नरेश रहिले | Updated: March 4, 2025 20:02 IST2025-03-04T20:01:16+5:302025-03-04T20:02:14+5:30
Gondia News: गोंदिया येथील माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू सुंदरलाल यादव (४२, रा. यादव चौक, गोंदिया) यांच्यावर ११ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या गोळीबार प्रकरणातील मास्टरमाईड प्रशांत मेश्राम याला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.

कल्लू यादव गोळीबार; मास्टरमाईंडला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, शहर पोलिसांच्या ताब्यात दिले
- नरेश रहिले
गोंदिया - येथील माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू सुंदरलाल यादव (४२, रा. यादव चौक, गोंदिया) यांच्यावर ११ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या गोळीबार प्रकरणातील मास्टरमाईड प्रशांत मेश्राम याला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.३) रात्री ८ वाजता त्याच्या घरावर धाड घालून ताब्यात घेतले.
माजी नगरसेवक व जय श्री महाकाल सेवा संस्थानचे अध्यक्ष कल्लू यादव ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सावलानी किराना दुकानाच्या समोरून जात असताना हेमू कॉलनी चौक येथे दिवसाढवळ्या पाच फूट अंतरावरून दोन दुचाकीस्वार नेमबाजांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या जीवघेण्या हल्ल्यात एक गोळी कल्लू यादव यांच्या शरीरात शिरली होती. डॉक्टरांनी ती गोळी काढून कल्लू यादव यांचे प्राण वाचविले होते. याप्रकरणी पोलिसांनी दान शूटर्सना अटक करून माऊसर पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, दोन दुचाकी, हल्ल्यात वापरलेले चार मोबाईल जप्त करून त्यानंतर एकूण नऊ आरोपींना अटक केली होती. या प्रकरणाचा मास्टरमाईंड प्रशांत मेश्राम हा तेव्हापासूनच म्हणजेच मागील १४ महिन्यांपासून फरार होता. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून तो सतत आपली ठिकाणे बदलत होता. अशातच गुप्तहेराकडून ठोस माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सोमवारी (दि.३) सायंकाळी भीमनगर परिसरात सापळा रचून मेश्रामच्या घराची झडती घेत त्याला पकडले.
मुख्यसुत्रधार दहावा आरोपी
या प्रकरणात १२ जानेवारी २०२४ रोजी आरोपी गणेश शिवकुमार शर्मा (२१, रा. भिडी ले आउट, वरोडा, ता. कळमेश्वर, जि. नागपूर), अक्षय मधुकर मानकर (२८, रा. सम्राट ग्राउंड शिक्षक कॉलोनी, कळमेश्वर जि. नागपूर), धनराज ऊर्फ रिंकू व राजेंद्र राऊत (३२, रा. कुंभारेनगर, गोंदिया), नागसेन बोधी मंतो (४१, रा. गौतम बुध्द वाॅर्ड, श्रीनगर, गोंदिया) यांना तर १३ जानेवारी रोजी शुभम विजय हुमणे (२७, रा. भिमनगर, गोंदिया), सुमित ऊर्फ पंछी विकास डोंगरे (२३, रा. कुंभारेनगर, गोंदिया) यांना, १४ जानेवारी रोजी रोहीत प्रेमलाल मेश्राम (३२, रा. कुंभारेनगर, गोंदिया), १५ जानेवारी रोजी नितेश ऊर्फ मोनू लखनलाल कोडापे (२८, रा. विहीरगाव, तिरोडा, ह.मु. कुंभारेनगर, गोंदिया) व मयुर ऊर्फ सानू विजय रंगारी (२७, रा. सिंगलटोली, आंबेडकर वाॅर्ड, गोंदिया) यांना अटक केली होती. आता ३ मार्च २०२५ रोजी प्रशांत मेश्राम या दहाव्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
४० लाखांत घेतली होती सुपारी
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर ११ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गोळीबार करणाऱ्या आरोपींना ४० लाखात सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात आरोपींना फक्त पाच हजार रूपये देण्यात आले होते.