जरा हटके! जेव्हा भंगाराला कलात्मक रूप मिळते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 02:21 PM2019-12-23T14:21:17+5:302019-12-23T14:23:48+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी भंगारातून (स्क्रॅप) अप्रतिम कलाकृती साकार करून नवे सृजन घडविले आहे.

Just different! When the scrap gets an artistic form ... | जरा हटके! जेव्हा भंगाराला कलात्मक रूप मिळते...

जरा हटके! जेव्हा भंगाराला कलात्मक रूप मिळते...

Next
ठळक मुद्देललित कला विभागाची सृजनशीलता राज्यात विद्यापीठांमधील पहिलाच अभिनव प्रयोग साकारल्या अप्रतिम कलाकृती

निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘जहां ना पहुंचे रवि, वहां पहुंचे कवि’,असे म्हणतात ते काही चूक नाही. कलावंतांमधील सृजनात्मकता अनाकलनीय असते. सामान्य माणसांना जो कचरा वाटतो, कलावंतांची दृष्टी त्यात नवीन सृजन करते. तुमच्या-आमच्या घरी जुन्या अडगळीत पडलेले साहित्य असतेच, ते साहित्य एक तर फेकणे किंवा विकणे, हे दोनच पर्याय आपल्याजवळ असतात किंवा सुचतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातही असेच भंगार पडलेले होते व वरील दोनच पर्याय त्यांच्याजवळ होते. पण विद्यापीठाच्या ललित कला विभागाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी या भंगारातून (स्क्रॅप) अप्रतिम अशी कलाकृती साकार करून नवे सृजन घडविले आहे.
भंगार किंवा निघणारा कचरा ही घरोघरची समस्या आहे. तुटलेल्या खुर्च्या, तुटलेले दरवाजे, जुने कूलर, पंखे, निरुपयोगी भांडे, खेळणी असे नानाविध भंगार अडगळीत पडलेले असते. कधी तरी दिवाळी किंवा एखाद्या समारंभासाठी स्वच्छता आरंभली की हे भंगार घराबाहेर विक्रीसाठी बाहेर पडते. नागपूर विद्यापीठाच्या विविध विभागामध्येही अशाचप्रकारे भंगार पडलेले आहे. जुन्या आलमारी, कूलर, पंखे, खुर्च्या, रॅक आणि ‘ई-वेस्ट’(संगणकाचे साहित्य)सुद्धा. विभागांची जागा व्यापून असलेला हा कचरा फेकायचा किंवा विकायचा, असा विचार विद्यापीठात सुरू होता. तेव्हा ललित कला विभागप्रमुख डॉ. मुक्तादेवी मोहिते यांनी हा कचरा आम्हाला द्या, अशी मागणी केली. प्रस्ताव ऐकून सर्वांना आश्चर्यही वाटले. पण मागणीनुसार विविध विभागाचे हे भंगार एक दिवस अमरावती रोड-अंबाझरी या मार्गावरील ललित कला विभागाच्या जागेवर पडले. लोकांना गंज चढून खराब दिसणारा, नकोसा वाटणाऱ्या या कचºयातून विभागातील कलात्मक मेंदूद्वारे नवे सृजन सुरू झाले.
विभागातील प्राध्यापक, चित्रकार व कलेचे विविध विषय शिकणारे विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन भंगारावर तुटून पडले. त्यांच्या कल्पनेतील कलाकृतीसाठी आवश्यक त्या साहित्याची जुळवाजुळव सुरू झाली. त्यानंतर प्राध्यापक व काही विद्यार्थी असे समूह तयार करून साहित्याची जोडणी व मांडणी सुरू झाली. ही कलात्मकता विभागाच्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त होती; पण या कलावंत मेंदूंनी सर्वांना नकोसे वाटणाºया या भंगारातून वेगळीच नवनिर्मिती केली. कल्पनेतील आकार जसा मिळाला, तसे प्रत्येकाचे डोळे आश्चर्याने भरले.
भंगार देणाºया विभागातील कर्मचाऱ्यांनाही, आपण दिलेला कचरा असे कलात्मक रूप घेऊ शकतो, याचेच आश्चर्य होते. गतिशील घोडा, चांद्रयान मोहीम, फुलपाखरू, लायब्ररी, विविध प्राणी, पशुपक्ष्यांचे रूप, रोबोट, झाडे, पदवी घेतलेला विद्यार्थी असे नानाविध लक्षवेधी रूप या भंगारातून निर्माण झाले. ही अप्रतिम रचना बघायला शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी व शिक्षक, उद्योग संस्थांचे प्रतिनिधी व विद्यापीठातील मान्यवरांनीही भेटी दिल्या. राज्यातील विद्यापीठांद्वारे घडलेला हा पहिलाच प्रयोग सर्वांना सुखावून गेला.

कार्यशाळेत विभागातील कलात्मक मेंदू
ललित कला विभागप्रमुख डॉ. मुक्तादेवी मोहिते यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमात डॉ.सदानंद चौधरी, डॉ.हरीश वाळके, डॉ.स्नेहल लिमये, डॉ.अमोल गुल्हाणे, प्रा.मौक्तिक काटे, प्रा.मनोज चोपडे, प्रा.महेश मानकर, प्रा.दीपक सोरते, प्रा.रुचिता अट्याळकर, हे सहभागी होते. डॉ.रवि हरिदास, प्रा.सुमित भोयर, डॉ.संयुक्ता थोरात यांनी सहकार्य केले तर मिलिंद लिंबेकर व अभिषेक चौरसिया यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद््घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ.दीपक खिरवडकर, कुलसचिव डॉ.नीरज खटी, डॉ.ढोबळे, डॉ.स्नेहा देशपांडे यांनी केले. कार्यशाळेचा समारोपीय कार्यक्रम डॉ. एस बी झाडे, डॉ. राजू मानकर, डॉ.विनोद इंदूरकर यांच्या उपस्थितीत पार पडला. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये जेरॉल्ड फ्रान्सिस, पल्लवी पन्नासे, नेहा पाटील, उत्कर्षा चिमोटे, नंदीनी दिघाडे, समर कोठीवान, संकल्प गायकवाड, शाकंबरी तिवारी, महिमा सिंग, फाल्गुनी मारबते, अश्वीनी भोयर, चारूता खारोकर, सोनाली बोरकर, धिरेंन्द्र बैस, राजेश्री काटे, पल्लवी रानडे, रोशनी प्रजापती परीतोष डवरे, अजय अवचट, प्रणाली वानवे, राणी वैरागडे, विनोद कावे, शुभम उमरेडकर, रोशनी पालीमकर, चेतन खिरेकर, स्मुती सब्बनवार, कवन कावडे यांचा समावेश होता.

नॅक कमिटीच्या भेटीनंतर विद्यापीठाने विविध विभागांना सृजनात्मक काही करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आम्ही भंगारातून कलाकृती साकारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार विभागाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी भंगारातून ही अप्रतिम कलाकृती साकारली आहे. ही कलाकृती आणखी १५ दिवस प्रदर्शनासाठी खुली राहणार आहे. भेटीसाठी आलेल्या शाळा-महाविद्यालय, उद्योग समूहांच्या प्रतिनिधींनीही अशी कलाकृती त्यांच्याकडे साकारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ही बाब खरोखर सुखावणारी आहे.
- डॉ. मुक्तादेवी मोहिते,
विभाग प्रमुख, ललित कला विभाग

Web Title: Just different! When the scrap gets an artistic form ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.