जरा हटके! लाख मोलाचा आफ्रिकन ब्रेवो मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 08:08 PM2020-03-05T20:08:27+5:302020-03-05T20:10:17+5:30

२४ तासांपूर्वी उडून गेलेला आफ्रिकन पोपट मानकापूर पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर काही तासांतच शोधून काढला.

Just different! Got a million bucks worth of African Bravo parrot | जरा हटके! लाख मोलाचा आफ्रिकन ब्रेवो मिळाला

जरा हटके! लाख मोलाचा आफ्रिकन ब्रेवो मिळाला

Next
ठळक मुद्देपोलिसांनी शोधून काढला२४ तास भटकला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माणसाच्या ताब्यातून मोठमोठ्या चिजवस्तू सटकल्या की त्या परत मिळणे अवघडच ! चिजवस्तू काय, महिला-पुरुष, मुले, मुली एकदा बेपत्ता झाल्या की त्यांना शोधून काढणे पोलिसांसाठी कठीण काम ठरते. तेथे एखादा पाळीव पक्षी आकाशात उडून गेला तर त्याला पोलीस कसे शोधून काढणार ? मात्र, म्हणतात की पोलिसांनी मनावर घेतले तर काहीही शक्य होते. अन् ते बुधवारी पुन्हा एकदा खरे ठरले. २४ तासांपूर्वी उडून गेलेला आफ्रिकन पोपट मानकापूर पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर काही तासांतच शोधून काढला.
विनोदकुमार माहोरे हे महावीरनगर झिंगाबाई टाकळी परिसरात राहतात. ते वेकोलित व्यवस्थापक आहे. त्यांच्याकडे एक आफ्रिकन पोपट आहे. हा पोपट म्हणजे माहोरे परिवारातील एक सदस्यच. राखडी रंगाचा अन् लाल शेपटीच्या या पोपटावर माहोरे कुटुंबीयांचा चांगलाच जीव आहे. प्रेमाने ते पोपटाला ब्रेवो म्हणतात. ब्रेवोही तसा आज्ञाधारीच. माहोरे कुटुंबीयांतील सदस्याची प्रत्येक गोष्ट तो निमूटपणे ऐकतो अन् त्यांनी सांगितल्याप्रमाणे बोलतो, करतोही. मात्र, मंगळवारी काय झाले कळायला मार्ग नाही. रात्री ७.३० च्या सुमारास ब्रेवोने माहोरेंच्या घरातून आकाशात भरारी घेतली. तो निघून गेल्याने अवघे माहोरे कुटुंबीय अस्वस्थ झाले. कावरेबावरे होऊन त्याची वाट बघू लागले. रात्रीची वेळ असल्याने त्याला शोधणे शक्य नव्हते. त्यामुळे तो परत येईल, या आशेवर माहोरे कुटुंबीयांनी अख्खी रात्र जागून काढली. मात्र, ब्रेवो परतला नाही. बुधवारी सकाळपासून माहोरे कुटुंबीयांनी ब्रेवोचा परिसरातील झाडांवर शोध घेतला. मात्र, तो आढळला नाही. त्यामुळे अखेर विनोदकुमार माहोरे यांनी मानकापूर ठाण्यात ब्रेवो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तक्रार नोंदविताना ब्रेवो मिळेल, अशी त्यांना खात्री नव्हती मात्र ब्रेवोच्या मायेने वेडे झालेल्या स्वत:च्या मनाची तसेच कुटुंबीयांची समजूत काढण्यासाठी त्यांनी पोलीस ठाणे गाठले. सुमारे एक लाख रुपये किंमत असलेल्या ब्रेवोच्या बेपत्ता होण्याची ठाणेदार वजिर शेख यांनी ‘मिसिंग’ दाखल करून घेतली. सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी पोपटाला शोधून काढण्याच्या सूचना केल्या. बुधवारी दुपारी शांतता समितीची पोलिसांनी बैठक घेतली. त्यातही बेपत्ता ब्रेवोची चर्चा झाली. त्यानंतर सोशल मीडियावर ब्रेवो व्हायरल झाला अन् ब्रेवोच्या शोधकार्यात नागरिकांचीही जोड मिळाली.

हाक देताच ब्रेवोने साद दिली
एका मुलाने पोलिसांना सायंकाळी फोन करून आमच्या अपार्टमेंटमध्ये एक ग्रे कलरचा पोपट असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी माहोरेसह त्या ठिकाणी धाव घेतली. २४ तासांपासून घरापासून दुरावलेला आणि अन्नपाण्याविना भटकणारा ब्रेवोही अस्वस्थ झाला. माहोरेने त्याला हाक देताच ब्रेवोनेही साद दिली. ये म्हणताच त्यांच्या खांद्यावर आला अन् मुलाने पित्याच्या कवेत जावे तसे त्यांच्या दोन्ही हातात आला. बराच वेळेपर्यंत ब्रेवो अन् माहोरेचा संवाद चालला अन् अखेर ते पोलीस ठाण्यात पोहचले.

पोलीस ठाण्यात ब्रेवोगिरी
माहोरेच्या हातात अर्थात कुटुंबीयात पोहचल्यामुळे ब्रेवोचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. मानकापूर ठाण्यात त्याने तो वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केला. ठाणेदार शेख यांच्यासह अनेकांशी गप्पा मारल्या. त्यांना धन्यवाद दिले. त्यांनी जवळ येऊन बसायला सांगताच पोलीस अधिकाºयाच्या खांद्यावर बसून ब्रेवोने ऐटीत फोटोही काढून घेतले.

 

 

Web Title: Just different! Got a million bucks worth of African Bravo parrot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.