‘आपली बस’ सक्षमीकरणाच्या नुसत्या घोषणाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:07 IST2020-12-06T04:07:52+5:302020-12-06T04:07:52+5:30
४३६ बस कधी धावणार : १३२० बसथांबेही कागदावरच लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीच्या अर्थसंकल्पात ...

‘आपली बस’ सक्षमीकरणाच्या नुसत्या घोषणाच!
४३६ बस कधी धावणार : १३२० बसथांबेही कागदावरच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीच्या अर्थसंकल्पात ‘आपली बस’ सक्षमीकरणाच्या दरवर्षी नवीन घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र या घोषणा कागदावरच राहतात. २०२०-२१ या वर्षाच्या अर्थसंकल्पात परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी मार्च २०२१ पर्यंत ४३६ बस धावतील अशी घोषणा केली. तसेच बस डेपोचे निर्माण, नवीन बसथांबे, वॉटर एटीएम सुरू करण्याच्या लोकप्रिय घोषणा केल्या, मात्र या घोषणा कागदावरच आहेत. अशा परिस्थितीत शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची परिवहन सेवा कशी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
परिवहन समितीचा २०२०-२१ या वर्षाचा ३०४ कोटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. यात मार्च २०२१ पर्यंत शहरात ४३६ बस धावतील अशी घोषणा केली होती. तर २०२०-२१ या वर्षाच्या अर्थसंकल्पात तत्कालीन सभापती बंटी कुकडे यांनी ४३१ बस मार्च २०२० पर्यंत धावण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मार्चपर्यंत ३६० बस धावत होत्या. कोरोना संसर्ग लक्षात घेता सप्टेंबरपर्यंत बससेवा बंदच होती. सध्या १५८ बस धावत आहेत. अर्थसंकल्पात अपेक्षित १२० कोटीचे उत्पन्न अशक्य आहे. मार्च २०२१ पर्यंत फार तर ४० ते ५० कोटीचा महसूल मनपाच्या तिजोरीत जमा होईल, अशी आशा असल्याची माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.