कोपऱ्यासाठी कामकाज ठप्प!
By Admin | Updated: July 1, 2014 00:53 IST2014-07-01T00:53:28+5:302014-07-01T00:53:28+5:30
गोंधळ घातला तरी निदर्शनास येऊ नये यासाठी अशा विद्यार्थ्यांना वर्गात कोपरा हवा असतो. तर हुशार विद्यार्थ्याचा प्रयत्न पुढच्या रांगेत बसण्याचा असतो. इतरांचा त्रास होऊ नये म्हणून शिक्षकही

कोपऱ्यासाठी कामकाज ठप्प!
जिल्हा परिषद : माध्यमिक शिक्षण विभागाचे गठ्ठे पडून
नागपूर : गोंधळ घातला तरी निदर्शनास येऊ नये यासाठी अशा विद्यार्थ्यांना वर्गात कोपरा हवा असतो. तर हुशार विद्यार्थ्याचा प्रयत्न पुढच्या रांगेत बसण्याचा असतो. इतरांचा त्रास होऊ नये म्हणून शिक्षकही अशा विद्यार्थ्यांना पुढच्या बाकावर बसविण्याच्या प्रयत्नात असतात. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात सध्या असाच प्रकार आहे. पण इथे पुढच्या टेबलवर बसायला कुणीही तयार नाही. सर्वांना कोपऱ्यातील टेबल हवा आहे. कोपरा साधण्याच्या वादात आठ दिवसांपासून विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे.
कामकाजाच्या दृष्टीने सर्व कार्यालये एकाच इमारतीत असावीत म्हणून जि.प.च्या जुन्या इमारतीमधील कार्यालये नवीन इमारतीत हलविण्यात आली. खाली झालेल्या या इमारतीत माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यालय आले.
आठ दिवसांपूर्वी सामान आणण्यात आले. परंतु नवीन कार्यालयात कोपऱ्यातील टेबल मिळावा, असा बहुसंख्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे. या वादात आठवड्यापासून फाईल्सचे गठ्ठे रस्त्यात पडून असल्याने कामकाज ठप्प आहे.
संस्थाचालक, शिक्षक व विभागातील कर्मचारी कामासाठी आठवड्यापासून चकरा मारत आहे. तासन्तास प्रतीक्षा करूनही संबंधित कर्मचारी वा अधिकारी टेबलवर मिळत नाही. कोण कुढे बसतो याची माहिती मिळत नसल्याने कामानिमित्त येणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. कामकाजाच्या दृष्टीने सर्व कार्यालये एका इमारतीत आणण्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांचा प्रयत्न स्तुत्य असला तरी, त्यांच्या चांगल्या कार्यात खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सरपंच भवन येथील कार्यालयाकडे वरिष्ठांचे फारसे लक्ष नव्हते. त्यामुळे माध्यमिक विभाग येथेच कायम असावा, असा विभागातील अधिकाऱ्यांचा प्रयत्न होता. परंतु जोंधळे यांनी तंबी दिल्यानंतर माध्यमिक विभागाचे कार्यालय जुन्या इमारतीत हलविण्यात आले. (प्रतिनिधी)