परभणी, बीडच्या घटनांची न्यायालयीन चौकशी करा; विधानसभेत सत्ताधारी आमदारांचीही आक्रमक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 08:48 IST2024-12-19T08:46:53+5:302024-12-19T08:48:52+5:30
विधानसभेत या घटनेवर नियम १०१ अन्वये अल्पकालिन चर्चा उपस्थित करण्यात आली.

परभणी, बीडच्या घटनांची न्यायालयीन चौकशी करा; विधानसभेत सत्ताधारी आमदारांचीही आक्रमक भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : परभणी व बीड येथे घडलेल्या घटना गंभीर आहेत. परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधान प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली. या घटनेचे चित्रीकरण करणारा निरपराध विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिस मारहाणीत मृत्यू झाला. तर बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. ही दोन्ही प्रकरणे बुधवारी विधानसभेत विरोधकांनी लावून धरली. या दोन्ही घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
विधानसभेत या घटनेवर नियम १०१ अन्वये अल्पकालिन चर्चा उपस्थित करण्यात आली. काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांनी चर्चेची सुरुवात केली. ते म्हणाले, परभणी येथील घटनेपूर्वी सकल हिंदू परिवारतर्फे विराट मोर्चा काढण्यात आला.
संविधान शिल्पाची तोडफोड करणारा आरोपी या मोर्चात सहभागी होता. या घटनेनंतर लोक संतप्त झाले. निदर्शने केली. त्यावेळी पोलिसांनी दलित वस्त्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवून बौद्ध महिलांनादेखील घराबाहेर काढून मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या महिलांचे फोटोही राऊत यांनी सभागृहात दाखविले. या घटनेचे चित्रीकरण करणारा सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन मारहाण केली. त्याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला.
या प्रकरणी दोषी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तर या प्रकरणातील आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राऊत यांनी केली. राजकुमार बडोले, राहुल पाटील. जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार यांनीही या मागणीचे समर्थन करीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत व कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मागणी केली.
'आका' मंत्री असेल, तर त्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढा, कराडला कुणाचे फोन आले, ते शोधा...
सरपंच देशमुख यांची हत्या राजकीय वरदहस्तातून झालेली आहे. वाल्मीक कराड हा कुणाचे काम करतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. घटनेच्या दोन दिवसात कराड याला व पोलिसांना कुणाचे फोन आले, याची आधी चौकशी करा. या प्रकरणातील 'आका' मंत्री असेल तर त्यालाही मंत्रिमंडळातून बाहेर करा. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.
'आका' दोषी असेल तर अटक करा : सुरेश धस
आ. सुरेश धस यांनी बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख याची अपहरण करून कशी हत्या करण्यात आली याचा घटनाक्रम सभागृहासमोर मांडला. हा घटनाक्रम मांडताना धस यांचा आवाज जड झाला तर सभागृह सुन्न झाले. देशमुख यांना साडेचार तास मारहाण करण्यात आली. त्यांचे तीन लिटर रक्त गोठले होते. त्यांचे डोळे लायटरने जाळण्यात आले. एवढेच नव्हे तर मारहाण करतानाचे चित्रण व्हिडीओ कॉल करून दुसऱ्याला दाखविण्यात आले. अशी क्रूर हत्या कधी पाहिली नसेल असे सांगत या 'गैंग ऑफ बीडपूर'चा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करून आरोपींशी संबंध असलेला 'आका' दोषी असेल तर त्यालाही अटक करा, अशी मागणीही धस यांनी केली. आ. नमिता मुंदडा यांनीही या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील वातावरण भयग्रस्त झाल्याचे सांगत आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी केली.