जिल्हा परिषदेत कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंत्यात जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:08 IST2021-04-10T04:08:01+5:302021-04-10T04:08:01+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेचे लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आणि कंत्राटदार यांच्यात चांगलीच जुंपली आहे. कार्यकारी अभियंत्याने कंत्राटदाराकडून जीवे ...

जिल्हा परिषदेत कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंत्यात जुंपली
नागपूर : जिल्हा परिषदेचे लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आणि कंत्राटदार यांच्यात चांगलीच जुंपली आहे. कार्यकारी अभियंत्याने कंत्राटदाराकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलीस पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. तर अभियंत्याकडून त्रयस्थ संस्थेला कामाची गुणवत्ता तपासणीसाठी परवानगी दिल्यावरून पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
अभियंत्याने दिलेल्या तक्रारीत कंत्राटदाराने पाझर तलाव दुरुस्ती व इतर कामांच्या निविदा प्रक्रियेत सहभाग घेऊ न दिल्यावरून मोबाईलवर कुटुंब व मला जीवे मारण्याची धमकी दिली़ या आशयाची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे़ कार्यकारी अभियंता यांनी तक्रारीत स्पष्ट केले की, कंत्राटदाराला २०२०-२१ या वर्षात तेलकामठी, रिधोरा खापरी, पिपळधरा व खराळा येथील कामे मंजूर करण्यात आली होती़. मात्र, कार्यारंभ आदेश झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत ही कामे करणे अनिवार्य होते. सर्वसाधारण सभेच्या २२ जानेवारी २०२१ च्या ठरावानुसार एका कंत्राटदाराची तीन किंवा अधिक कामे अपूर्ण असल्यास त्याला नवीन कामाच्या निविदा प्रक्रियेत सहभाग घेता येत नाही़ तरीही कंत्राटदाराने चार कामे अपूर्ण असतानाही २०२१-२२ या वर्षाच्या निविदा प्रक्रियेत आठ कामांमध्ये सहभाग नोंदविला़ त्यामुळे कंत्राटदाराला अपात्र ठरविण्यात आले़ या प्रक्रियेत सहभाग घेऊ न दिल्याचा राग मनात ठेवून कंत्राटदाराने मोबाईलवर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली, असा तक्रारीत उल्लेख आहे.