बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुदानित शाळेत लाटली नोकरी; १० वर्ष शासनाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 22:58 IST2025-01-07T22:58:36+5:302025-01-07T22:58:36+5:30
शिक्षिकेसह मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल, आयएफटीएम विद्यापीठात गांजरे यांनी चौकशी केली असता गोस्वामीने दिलेली गुणपत्रिका बनावट असल्याची बाब समोर आली.

बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुदानित शाळेत लाटली नोकरी; १० वर्ष शासनाची फसवणूक
योगेश पांडे - नागपूर
नागपूर - एका महिलेने बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुदानित शाळेत शिक्षिकेची नोकरी लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित शिक्षिका व तिला सहकार्य करणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.
सर्वश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सहायक शिक्षिका गौरी राजाभाऊ गोस्वामी (दिघोरी) व मुख्याध्यापक राजेश काशीनाथ मासुरकर (ओमनगर) अशी आरोपींची नावे आहेत. तर एसएफएस हायस्कूलचे सहायक शिक्षक हेमंत गांजरे हे तक्रारदार आहेत. गौरीने बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविल्याची माहिती २०२२ साली गांजरे यांना मिळाली होती. त्यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत गोस्वामीच्या कागदपत्रांची मागणी केली. त्यांना गोस्वामीने आयएफटीएम विद्यापीठातून बीएड तर मेघालय येथील विल्यम कॅरे विद्यापीठातून बीएस्सी केल्याची कागदपत्रे देण्यात आली.
आयएफटीएम विद्यापीठात गांजरे यांनी चौकशी केली असता गोस्वामीने दिलेली गुणपत्रिका बनावट असल्याची बाब समोर आली. त्यानंतर गांजरे यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी गोस्वामी यांनी अहमदाबाद येथील कॅरोलक्स विद्यापीठातून बीए व बीएड केल्याची कागदपत्रे पोलिसांना दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्याध्यापक मासुरकरदेखील होते. गांजरे यांनी या कागदपत्रांची माहिती घेतली असता तीदेखील बनावट असल्याची बाब समोर आली. मासुरकरने सर्व कागदपत्रे खरी असल्याचे माहिती अधिकाराअंतर्गत सांगितले होते व गोस्वामीचा बचाव केला. अखेर गांजरे यांनी गोस्वामीने २०१४ सालापासून बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार केली. पोलिसांनी चौकशीनंतर गोस्वामी व मासुरकरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.