जिजाऊंनी स्त्री सन्मानाची भाषा शिकवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:20 IST2021-01-13T04:20:57+5:302021-01-13T04:20:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिजाऊंनी स्त्री सन्मानाची भाषा शिकवली आणि शिवरायांनी त्याच भाषेची अंमलबजावणी केली. त्याच शिकवणीनुसार मानसिक ...

जिजाऊंनी स्त्री सन्मानाची भाषा शिकवली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिजाऊंनी स्त्री सन्मानाची भाषा शिकवली आणि शिवरायांनी त्याच भाषेची अंमलबजावणी केली. त्याच शिकवणीनुसार मानसिक खच्चीकरण झालेल्या महिलांना बळ देण्याचे कार्य जिजाऊंच्या लेकी करतील, अशी भावना डॉ. लीना निकम यांनी व्यक्त केली.
भाऊसाहेब सुर्वे ले-आऊट येथील मराठा सेवा संघाच्या सभागृहात मराठामार्गच्या वतीने आयोजित जिजाऊ जन्मोत्सव व जिजाऊ विशेषांक प्रकाशन सोहळ्यात निकम अध्यक्षस्थानाहून बोलत होत्या. यावेळी कमलाबाई देशमुख, संयोगिनी धनवटे, वृंदा ठाकरे, कुमुदिनी कडव, जया देशमुख उपस्थित होत्या. कमलाबाई देशमुख यांना रेखाचित्र, मानपत्र देऊन मधुकर मेहकरे यांना सन्मानित करण्यात आले.
जिजाऊंच्या प्रेरणेने शिवरायांनी अत्यंत कठीण काळात स्वराज्याची स्थापना केली. त्याच धर्तीवर कितीही कठीण प्रसंग असला तरी जिजाऊ विचार बळकटी देईल. स्त्री ही जन्मापासूनच कणखर असते आणि जिजाऊंचा विचार त्यांना आणखी कणखर करेल, असे लीना निकम यावेळी म्हणाल्या. यावेळी जिजाऊ चित्रकला स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळाही पार पडला. प्रज्ञा इंगवले यांना प्रथम, भावना डोंगरे यांना द्वितीय व निकिता ढवळे यांना तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशाखा मोहिते, चिदानंद ठाकरे, मधुरा ठाकरे, सांची भगत यांना प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. आनंद मांजरखेडे यांनी जिजाऊंच्या शिकवणुकीचा धडा गिरविण्याचे आवाहन केले. बबन नाखले यांनीही मार्गदर्शन केले. मानपत्राचे वाचन अनिता ढेंगरे यांनी केले. संचालन अरुणा भोंडे यांनी केले तर प्रास्ताविक जया देशमुख यांनी केले. आभार कुमुदिनी कडव यांनी मानले. यावेळी अस्मा तन्वीर खान यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विशेषांकाचे व्यवस्थापकीय संपादक मधुकर मेहकरे, दीपक कापसे यांच्यासह शीतल देशमुख, प्रांजल बडोले, सोनाली दळवी, परीक्षक सदानंद चौधरी व आशिष उजवणे उपस्थित होते.