मोबाइल चोरी करताना सापडला झारखंडचा गुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:56 IST2021-02-05T04:56:01+5:302021-02-05T04:56:01+5:30
नागपूर : झारखंड येथील गुन्हेगार मोबाइल व वाहन चोरी प्रकरणात पाचपावली पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याजवळून ...

मोबाइल चोरी करताना सापडला झारखंडचा गुन्हेगार
नागपूर : झारखंड येथील गुन्हेगार मोबाइल व वाहन चोरी प्रकरणात पाचपावली पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याजवळून दोन मोबाइल व बाइक जप्त केली. शेख गुलफराज ऊर्फ भोलू शेख मकसूद (२०), रा. मराजपूर, साहबगंज झारखंड असे आरोपीचे नाव आहे.
रेल्वे कर्मचारी जेम्स स्वामीनाथन ३० जानेवारी रोजी कडबी चौकात भाजीपाला विकत घेत होते. त्याचवेळी त्यांच्या शर्टच्या खिशातून मोबाइल चोरीला गेला. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांना यात गुलफराजचा हात असल्याचे समजले. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्याने मोबाइलसह नंदनवन येथून बाइक चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली. गुलफराज आपल्या साथीदारासह एक महिन्यापूर्वी नागपुरात आला होता. तो धम्मानंदनगर येथे भाड्याने राहत होता. त्याचे साथीदार वेगवेगळ्या समूहात मोबाइल चोरी करतात.
आठवडी बाजारात लोकांची गर्दी असते. ज्यांच्या शर्टच्या खिशात मोबाइल ठेवला असतो, त्यांना गुलफराज व त्याचे साथीदार आपले शिकार बनवतात. ते नजर चुकवून मोबाइल लंपास करतात. गुलफराजने पोलिसांना आपल्या साथीदारांची माहिती दिली नाही. झारखंडच्या गुन्हेगारांना यापूर्वी मोबाइल चोरीची टोळी चालवताना पकडण्यात आले आहे. ही कारवाई पीआय किशोर नगरारे, मुकुंद ठाकरे, पीएसआय अरविंद ठाकरे, प्रमोद खंडार, एएसआय रहमत शेख, नायक शैलेंद्र चौधरी, नितीन धकाते, राजू श्रीवास आणि रोमेश मेनोवार यांनी केली.