दादासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी दीक्षाभूमीवर जनसागर
By Admin | Updated: July 26, 2015 03:05 IST2015-07-26T03:05:07+5:302015-07-26T03:05:07+5:30
केरळ व बिहारचे माजी राज्यपाल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष दिवंगत रा.सू. गवई यांचे शनिवारी दुपारी नागपुरात निधन झाले.

दादासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी दीक्षाभूमीवर जनसागर
‘अमर रहे’च्या घोषणांचा निनाद : हजारोंनी घेतले अंत्यदर्शन
नागपूर : केरळ व बिहारचे माजी राज्यपाल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष दिवंगत रा.सू. गवई यांचे शनिवारी दुपारी नागपुरात निधन झाले. नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव दीड तास दीक्षाभूमीवर ठेवण्यात आले होते.
यादरम्यान त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला होता. हजारो लोकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेत आदरांजली अर्पण केली.
सायंकाळी ५.१० वाजताच्या सुमारास पंचशीलेच्या ध्वजात लपेटलेले दिवंगत रा.सू. गवई यांचे पार्थिव दीक्षाभूमीवर आणण्यात आले. त्यांचे पार्थिव येताच ‘दादासाहेब अमर रहे’ च्या घोषणा निनादल्या. दीक्षाभूमीवरील मध्यवर्ती स्मारकाच्या समोर दिवंगत दादसाहेब गवर्इंचे पार्थिव नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले.
सुरुवातीला भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात सामुहिक त्रिशरण, पंचशील, बुद्ध वंदना व धम्म वंदना घेण्यात आली. दिवंगत दादासाहेब गवई यांच्या पत्नी कमलताई, चिरंजीव न्या. भूषण व राजेंद्र यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबीय यावेळी हजर होते.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्यासह माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुलेखा कुंभारे, राजेंद्र मुळक, आ. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, माजी खासदार गेव्ह आवारी, ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद्र खांडेकर, डॉ. भाऊ लोखंडे, प्रा. रणजित मेश्राम, प्रा. अशोक गोडघाटे, ज्येष्ठ कवी ई.मो. नारनवरे , अॅड.मुकेश समर्थ, अॅड.फिरदोस मिर्झा, आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे, रिपाइं नेते हरीदास टेभुर्णे, भूपेश थुलकर, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, राजू बहादुरे, एन.आर. सुटे, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अरुण गाडे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बबनराव बोंदाटे, नरेश वाहने, प्रकाश कुंभे, राजन वाघमारे, अशोक कोल्हटकर, संजय जीवने, मनसेचे प्रशांत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख, आंबेडकरी विचार मोर्चाचे नारायण बागडे, अशोक जांभुळकर, जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, निळू भगत आदींसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दादासाहेबांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.(प्रतिनिधी)
दादासाहेबांचे काम नव्या पिढीला प्रेरणादायी
मान्यवरांच्या शोकसंवेदना : सच्चा भीमसैनिक गमावला
माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादादासाहेब गवई यांचे शनिवारी निधन झाले. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात दादासाहेब यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. आंबेडकरी विचार जोपासण्यासाठी दादासाहेबांनी केलेले काम, दीक्षाभूमी साकारण्यासाठी घेतलेले परिश्रम कधीच विसरता येणार नाही. त्यांचे काम नव्या पिढीला सतत प्रेरणा देणारे ठरेल, अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
दादासाहेबांचे संसदीय लोकशाहीवर अपार प्रेम होते. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या तालमीत तयार झालेले दादासाहेब गवई यांनी आंबेडकर चळवळीला समोर नेण्याकरिता अनेक कष्ट घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पूर्ण होऊ शकले. दादासाहेबांनी भूमिहीनांना मालकी हक्काचे पट्टे मिळवून देण्यासाठी केलेला सत्याग्रह कधीही विसरता येणार नाही. दादासाहेबांनी आपल्या मिश्किल स्वभावामुळे सर्वांची मने जिंकून विधान परिषद उपसभापती ते राज्यपाल पदापर्यंतचा मोठा पल्ला गाठला. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण आदरांजली.
- मुकुल वासनिक, सरचिटणीस,
अ.भा. काँग्रेस कमिटी
दिन, दलित, गरिबांसाठी हिरीरीने भांडणारा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर नितांत श्रद्धा असणारा, किंबहुना ्यांच्या विचारांचा प्रचार- प्रसार खंबीरपणे करणारा एक विदर्भवादी थोर नेता रा.सु. गवई यांच्या निधनाने विदर्भाने गमावला आहे. एक उत्कृष्ट प्रशासक, संसदपटू, सामाजिक कार्य व उत्तम शिक्षम संस्था चालविण्याचे काम गवई यांनी केले आहे. बाबासाहेबांनी दीक्षा घेतली त्या दीक्षाभूमीला जे स्वरुप प्राप्त झाले त्यात गवई यांचे मोठे योगदान आहे. माझ्यासोबत संसदेत असताना अरुण शौरी यांच्या पुस्तकावरून झालेल्या खडाजंगीत ज्या तऱ्हेने गवई यांनी बाबासाहेबांचे विचार त्यांना विरोध करणाऱ्या लोकांपुढे मांडले. ते ऐकूण बाबासाहेबांच्या विचारांचे मंथन आणि चिंतन किती गहन आहे याचा संसदेला प्रत्यय आला. त्यांच्या निधनाने एक दलित नेता, थोर समाजसेवक व विदर्भाची चिंता असलेला एक नेता आम्ही गमाविला आहे.
- विलास मुत्तेमवार, माजी खासदार
दादासाहेब गवई हे एक मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी दलित चळवळीच्या माध्यमातून जमिनीवरील माणसाला मानसन्मान मिळवून दिला. त्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी येथे भव्य स्मारक उभारण्यात आले. यामुळे नागपूर शहराला देशातच नव्हे तर जगभरात एक नवीन ओळख मिळाली. आजच्या तरुण नेत्यांनी त्यांचा आदर्श ठेवण्याची गरज आहे. त्यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले. महापौर म्हणून शहरातील जनतेच्यावतीने भाजपतर्फे तसेच माझ्या कुटुंंबीयांतर्फे त्यांना अभिवादन करतो.
- प्रवीण दटके महापौर, मनपा
दादासाहेब गवई हे आंबेडकरी आंदोलनाचे अग्रणी नेते होते. अनेक दिवस त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. गरीब, दलित शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले. संघर्षातूनच त्यांचे नेतृत्व घडले. संघर्षातून त्यांनी अनेक पदे प्राप्त केली. त्यांचे निधन हे समाजाची मोठी क्षति असून, समाज एका संघर्षशील नेत्याला मुकला आहे.
- आ. प्रा. जोगेंद्र कवाडे
अध्यक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी
गेल्या पाच दशकांपासून केंद्र व राज्याच्या राजकारणात त्यांनी आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जोपासणारे ते एक सच्चे भीमसैनिक होते. त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीला एक नवी दिशा दिली व समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्न केले.
- अनिल देशमुख, माजी मंत्री
विदर्भाचे सुपुत्र आणि रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रा.सू. गवई यांचे दु:खद निधन झाल्याचे ऐकून धक्काच बसला. विधानपरिषदेचे उपासभापती, सभापती आणि पुढे राज्यपाल म्हणून त्यांनी अलौकिक योगदान दिले आहे. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून मैत्री ठेवणारा हा कुशल संघटक होता. त्यांच्या निधनाने मी स्वत: एक मार्गदर्शक गमावला आहे.
- गिरीश गांधी, विश्वस्त वनराई
दिवंगत दादासाहेबांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीचे खंबीर नेतृत्व हरपले आहे. त्यांच्याशी माझा लहानपणापासून संबंध आला आहे. बौद्धांच्या आरक्षणासाठी दिल्लीतील बोट क्लब मैदानावर दिवंगत दादासाहेब आणि माझे वडील उपोषणावर बसले होते. त्या आंदोलनात मी सुद्धा सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी समाजासाठी घेतलेली खंबीर भूमिका मी जवळून अनुभवली. त्यांच्या निधनाने चळवळीची मोठी हानी झाली आहेच, परंतु माझे व्यक्तिगत नुकसानसुद्धा मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
- सुलेखा कुंभारे, मुख्य संयोजक,
बहुजन रिपब्लिकन एकता मंच
दादासाहेब हे एक मोठे व्यक्तिमत्त्व होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी बाबासाहेबांनी दीक्षा घेतलेले स्थळ ‘दीक्षाभूमी’ला जगप्रसिद्ध करण्याची जबाबदारी पार पाड पाडली. सर्व जातीधर्मातील लोकांना या कामासाठी सोबत घेतले. हा परिसर पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. मी मंत्री झालो तेव्हा त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. त्यावेळी पदावरून राहून गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा व मदतीचा हात देण्याची सूचना करीत त्यांनी आशीर्वाद दिले होते.
- राजेंद्र मुळक, आमदार
दादासाहेबांनी महाराष्ट्रातील राजकीय पटलावर आपल्या कार्याचा ठसा उमटविला. दलित समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले काम विसरता येणार नाही. सर्वच राजकीय पक्षात त्यांनी आदराचे स्थान प्राप्त केले होते. ते राजकारणापलीकडे काम करणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने कुशल संघटक व द्रष्टा नेता काळाच्या पडद्याआड गेला.
- विकास ठाकरे,
अध्यक्ष, नागपूर शहर काँग्रेस कमिटी
विदर्भातील मातीत जन्मलेले व गेल्या पाच दशकापेक्षा अधिक काळ देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात, आंबेडकरी, दलित व राजकीय-सामाजिक चळवळीत काम करणारे एक मोठे आणि ज्येष्ठ नेतृत्व आज हरपले आहे. यामुळे चळवळीचे व महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे.
- अजय पाटील,
शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
आंबेडकरी सम्यक क्रांतीच्या यशस्वीतेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या अगदी बिनीच्या शिलेदारांमध्ये दादासाहेब गवई यांचा अंतर्भाव होतो. जीवनात आलेल्या प्रत्येक संधीचा त्यांनी नीतीकारक पद्धतीने जनकल्याणासाठी वापर केला. राजकारण, धम्मकारण, साहित्य, संस्कृती, शिक्षण आणि संविधान समीक्षक यामधील त्यांचे योगदान अविस्मरणीय राहील.
- ताराचंद्र खांडेकर, ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक
समाजातील अतिशय महत्त्वाचा टप्पा गाठणारा आणि समाजाला पुढे नेणारा आधारस्तंभ ढासळला आहे, त्याचे दु:ख आहे. दीक्षाभूमीवरील ऐतिहासिक स्मारक हे जगविख्यात झाले ते केवळ दादासाहेब गवई होते म्हणूनच. त्यांच्या निधनाने चळवळीचे मोठे नुकसान झाले.
- कृष्णा इंगळे
अध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ
दादासाहेब गायकवाड यांच्यानंतर रिपब्लिकन चळवळीला पुढे नेण्याचे कार्य दादासाहेब गवई यांनीच केले. त्यांच्या निधनामुळे रिपब्लिकन चळवळीची मोठी हानी झाली आहे. विधानसभेत, लोकसभेत आणि राज्यसभेत त्यांनी दलित बौद्धांच्या प्रश्नांना वाचा फोडली. एक अभ्यासू राजकारणी म्हणून संपूर्ण देश त्यांना ओळखत होता. त्यांची कारकीर्द ऐतिहासिक राहिली आहे. दीक्षाभूमीचा भव्य स्तुप उभारणीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.
- डॉ. प्रदीप आगलावे, आंबेडकर विचारधारा विभागप्रमुख
दीक्षाभूमीला खऱ्या अर्थाने रा.सू. गवई यांनीच साकारले आहे. त्यांच्यामुळेच आज दीक्षाभूमीचे भव्य रूप पाहायला मिळाले आहे. त्यांनी राजकारणासह बौद्ध धम्माच्या कार्यालाही गती दिली. या सामाजिक दायित्वाचा वारसा समोर घेऊन जाणे हीच खरी आदरांजली ठरेल.
- भूपेश थूलकर, रिपाइं (आ) नेते
दलित समाजाचे झुंजार नेतृत्व व रिपब्लिकन पक्ष एकीकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणारे नेतृत्व हरपल्याने महाराष्ट्रातील दलित समाजाच्या नेतृत्वात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. दादासाहेबांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रातील काम विसरता येणार नाही.
- सरोज खापर्डे, माजी केंद्रीय मंत्री
रा.सू. गवई हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. दीक्षाभूमीवरील भव्य स्मारकाच्या वास्तूमुळे त्यांचे नाव इतिहासात अमर झाले आहे. त्यांनी चळवळीतील कार्यकर्त्यांना जपण्याचे काम केले. तो कोणत्या पक्षाचा आहे, हे कधीही न पाहता चळवळीत असलेल्या कार्यकर्त्याला त्यांनी बळ दिले. त्यामुळे त्यांच्या निधनाने चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
- संजय जीवने, नाटककार
युवावस्थेत दादासाहेबांचा विदर्भ केसरी म्हणून गौरव केला जायचा. त्यांनी महाराष्ट्रासह पंतप्रधानांपर्यंत बौद्धांच्या समस्या मांडून समाजाचे नेतृत्व केले. बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांनी बुद्धगयेतील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी प्रयत्न केले. आशियातील सर्वात मोठा स्तूप दीक्षाभूमीत साकारण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. त्यांच्या निधनाने एका प्रभावशाली नेतृत्वाचा अंत झाला. भारतीय बौद्धांच्या नेतृत्वाची क्रांतिकारी त्रिमूर्ती म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, बाबू हरीदास आवळे आणि रा.सू. गवई होते.
- डॉ. भाऊ लोखंडे, विचारवंत व लेखक
रा.सू. गवई हे आंबेडकरी आंदोलनाचे अंतिम बादशाह होते. त्यांच्यानंतर आंबेडकरी विचारधारा घेऊन लढणारा नेते राहिलाच नाही. लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन आंदोलन करतील, परंतु ते आंदोलन त्या नेत्याच्या मर्जीतील राहील. ते आंदोलन आंबेडकरांच्या विचारधारेचे आंदोलन राहणार नाही.
-अॅड. विमलसूर्य चिमणकर, केंद्रीय संघटक समता सैनिक दल
दादासाहेब गवर्इंचे व्यक्तित्व बाबासाहेबांप्रमाणेच विद्रोही होते. राजकारणात आल्यापासूनच त्यांना विदर्भाचा वाघ म्हणून ओळखले जात होते. ते राज्यसभेत पत्रकार अरुण शौरी यांचे पुस्तक सार्वजनिकरीत्या फाडण्यापर्यंत त्यांचे विद्रोही रूप लोकांना अवगत होते. त्यांच्या निधनाने हा विद्रोही बाणा आता महाराष्ट्राच्या राजकारणात दिसणार नाही.
- यशवंत मनोहर, ज्येष्ठ साहित्यिक
राजकारणासोबतच बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे कामही रा.सू. गवई यांनी मोठ्या तन्मयतेने केले. त्यांच्या निधनामुळे समाजाची मोठी हानी झाली आहे.
- प्रा. रणजित मेश्राम, ज्येष्ठ पत्रकार
दादासाहेब गवई यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू नेतृत्व हरवले आहे. त्यांनी अखेरपर्यंत आंबेडकरी आंदोलन जिवंत ठेवण्याचे काम केले. रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व केले. दीक्षाभूमीवरील भव्य स्मारक उभारून नागपूरच्या बौद्ध समाजाला त्यांनी जागतिक स्तरावर पोहोचण्याचे कार्य केले.
- डॉ. मिलिंद माने, आमदार
दीक्षाभूमी परिसरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात मी प्राध्यापक होतो. त्यामुळे दादासाहेबांशी माझा अनेकदा संपर्क आला. वैचारिक मतभेद असले तरी व्यक्तिगत संबंध चांगले असावेत, यावर त्यांचा भर होता. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ कायदेमंडळात घालवणाऱ्या राजकीय नेत्यांपैकी ते एक होते. जवळपास ४० वर्षे त्यांनी कायदेमंडळात घालवली. दीक्षाभूमीवरील ऐतिहासिक स्मारकाची वास्तू उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
- प्रा. अशोक गोडघाटे, विचारवंत