नागपूर सिटिझन्स फोरमतर्फे सुयोगनगर उद्यानात आज जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:14 IST2021-02-06T04:14:18+5:302021-02-06T04:14:18+5:30
नागपूर : शहरातील उद्यानांत नागरिकांना प्रवेश शुल्क लावण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेने मागे घेतला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके ...

नागपूर सिटिझन्स फोरमतर्फे सुयोगनगर उद्यानात आज जल्लोष
नागपूर : शहरातील उद्यानांत नागरिकांना प्रवेश शुल्क लावण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेने मागे घेतला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी याबाबतची घोषणा केली. नागपूर सिटिझन्स फोरमने हा मुद्दा उचलून धरत मनपाच्या धोरणांचा विरोध केला होता. गेल्या पाच दिवसांपासून नागपूर शहरातील विविध उद्यानांमध्ये निषेध आंदोलन व स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती. तब्बल साडेचार हजार नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला. त्यांच्या लढ्याला अखेर यश आल्याने नागपूर सिटिझन्स फोरमतर्फे उद्या, शनिवारी सकाळी ८ वाजता सुयोगनगर उद्यानात जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. नागपूरकरांच्या सामूहिक प्रयत्न व जनरेट्यामुळे हे शक्य झाल्याचे फोरमचे पदाधिकारी अभिजित झा, अभिजित सिंह चंदेल, अमित बांदूरकर यांनी म्हटले आहे.
---------------
मनसेचे मनपा आयुक्तांना निवेदन
उद्यानांचे खासगीकरण थांबवा व उद्यान शुल्क रद्द करा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शिष्यमंडळात शहर अध्यक्ष अजय ढोके, उमेश बोरकर, संगीता सोनटक्के, महेश माने, तुषार गिऱ्हे, लाला ससाणे, सुभाष ढबाले, मोहीत देसाई, श्याम मेंढे आणि जमशेद अंसारी यांचा समावेश होता.