जबलपूरचा गुंड अक्कूला पिस्तुलासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:33 IST2018-05-03T00:33:05+5:302018-05-03T00:33:17+5:30
पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत जखमी झाल्यानंतर फरार झालेला जबलपूरचा आरोपी अक्कू ऊर्फ आकाश गरकवार गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याला इंदोरा येथे पिस्तुल आणि काडतुसासह पकडण्यात आले आहे.

जबलपूरचा गुंड अक्कूला पिस्तुलासह अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत जखमी झाल्यानंतर फरार झालेला जबलपूरचा आरोपी अक्कू ऊर्फ आकाश गरकवार गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याला इंदोरा येथे पिस्तुल आणि काडतुसासह पकडण्यात आले आहे.
अक्कूची जबलपूरमध्ये दहशत आहे. त्याच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह अनेक गुन्हे दाखल आहेत. डिसेंबर २०१७ मध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तो जखमी झाला होता. त्याला गोळी लागली होती. सूत्रांनुसार जबलपूर पोलिसांनी त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान अक्कूने साथीदारांनी त्याला गोळी मारली नव्हती तर पोलिसांनी गोळी मारल्याचे सांगितले. त्याने न्यायालयातही हेच बयाण दिले होते. त्या आधारे जबलपूर पोलिसांचे सहा कर्मचारी निलंबित झाले होते. उपचारादरम्यान अक्कू जबलपूरच्या शासकीय रुग्णालयातून फरार झाला होता. त्यानंतर त्याने जरीपटका ठाण्यांतर्गत इंदोराच्या एका घरात आसरा घेतला होता. तो येथे उपचाराच्या बहाण्याने राहत होता. गुन्हे शाखेला त्याची माहिती मिळाली. त्यांनी अक्कूला पकडले. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ पिस्तुल आणि चार काडतुसे आढळली. पकडल्यानंतर अक्कूने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने जबलपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्यास जीवाला धोका असल्याचे सांगितले. त्याच्या मते पोलिसांनीच त्याला पळून जाण्यास सांगितले होते. अक्कूची जबलपूर, रायपूरसह अनेक शहरात दहशत आहे. तो कुख्यात गुंड आहे. अनेकदा तो पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला आहे. ही कारवाई उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आचल मुदगल, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पगार, हवालदार प्रकाश वानखेडे, सय्यद वाहिद, बलजीत ठाकूर, शाम गोरले यांनी पार पाडली.