इतवारी रेल्वे स्टेशनला ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ यांचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2023 22:58 IST2023-06-29T22:57:36+5:302023-06-29T22:58:24+5:30
Nagpur News इतवारी रेल्वे स्टेशनला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संमतीनंतर राज्य सरकारने अधिसूचना जारी केली असून, हे स्टेशन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने ओळखले जाईल.

इतवारी रेल्वे स्टेशनला ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ यांचे नाव
नागपूर : इतवारी रेल्वे स्टेशनला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संमतीनंतर राज्य सरकारने अधिसूचना जारी केली असून, हे स्टेशन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने ओळखले जाईल.
१६ जून रोजी सहसचिव सिद्धार्थ खरात यांच्या स्वाक्षरीने जारी अधिसूचनेत असे म्हटले आहे की, नामांतरणाच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहमंत्रालयाने २३ मे रोजी नाहरक प्रमाणपत्र जारी केले आहे. याचा आधार घेत राज्य सरकारने इतवारी रेल्वे स्टेशनला आता नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशन असे नाव देण्याचे निर्देशित केले आहे. यासोबतच सर्व शासकीय कार्यालयांना दस्तावेजांमध्ये बदललेल्या नावानुसार दुरुस्ती करण्याचे निर्देशही या अध्यादेशात देण्यात आले आहेत. ही मागणी सातत्याने लावून धरणारे आमदार कृष्णा खोपडे यांनी राज्य सरकारच्या या अधिसूचनेचा हवाला देत सांगितले की, सोमवार दक्षिण मध्य पूर्व रेल्वे मंडल रेल प्रबंधक यांची भेट घेऊन नामांतरणासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची विनंती केली जाईल.
रेल्वे प्रशासन तूर्तास अनभिज्ञ
- दक्षिण मध्य पूर्व रेल्वे नागपूर मंडळाकडे रात्रीपर्यंत या संबंधात कुठलीही माहिती आली नव्हती. झोनचे मुख्य जनसंपर्क अधिकारी साकेत रंजन म्हणाले की, अद्याप अशी कुठलीही माहिती आलेली नाही. माहिती मिळताच कळविले जाईल.
असा आहे घटनाक्रम
वर्ष २०२२ : महापालिकेने एकमताने प्रस्ताव पारित केला.
२३ ऑगस्ट २०२२ : राज्य मंत्रिमंडळाने इतवारी स्टेशनला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
६ सप्टेंबर २०२२ : राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठविला.
२३ मे २०२३ : केंद्रीय गृहमंत्रालयाने संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून राज्याला नाहरकत प्रमाणपत्र पाठविले.
१६ जून २०२३ : राज्य सरकारने अधिसूचना जारी केली.