गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, हे ‘कसले ब्रेक द चेन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST2021-04-12T04:07:24+5:302021-04-12T04:07:24+5:30
नागपूर : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊन लावताना ‘ब्रेक द चेन’ ...

गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, हे ‘कसले ब्रेक द चेन’
नागपूर : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊन लावताना ‘ब्रेक द चेन’ अभियान सुरू केले. त्यामुळे सर्वच बाजारपेठांमधील दुकाने ५ एप्रिलच्या रात्रीपासून बंद आहेत. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांचे जगणे कठीण बनले आहे. गेले संपूर्ण वर्ष असेच गेल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्यावर गळ्यातील चेन मोडायची वेळ आली आहे आणि हे कसले ‘ब्रेक द चेन’ असा सवाल छोट्या व्यापाऱ्यांचा आहे.
गेल्यावर्षी २४ मार्चपासून केंद्र सरकारने लॉकडाऊन लावल्यानंतर तब्बल चार महिने दुकाने बंद होती. त्यामुळे नागपुरातील बाजारपेठांमध्ये जवळपास ३५०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. व्यवसाय नाही, उत्पन्नही नाही, पण बँकांच्या कर्जाचे व्याज वाढले. शिवाय कामगारांचा पगार, विजेचे बिल, शासनाचा कर, जीएसटी आणि अन्य खर्च कायम होता. खर्चाची जुळवाजुळव कशी केली, याचे उत्तर व्यापाऱ्यांजवळ नाही.
पुन्हा एकदा मार्चमध्ये १६ ते ३० मार्चपर्यंत दुकाने दुपारी १ आणि दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्याचे बंधन घातले. शिवाय ५ एप्रिलच्या रात्रीपासून दुकाने बंद आहेत. त्याचा फटका छोट्या आणि मध्यम दुकानदारांना बसत आहे. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांना पगार देणे कठीण बनले आहे. ३० एप्रिलपर्यंत असलेल्या ‘ब्रेक द चेन’ने आणखी नुकसान होणार आहे. अनेकांनी दुकाने बंद केली आहेत. संसाराचा गाडा चालविण्यासाठी पुढे काय करावे, असा प्रश्न सर्वच व्यापाऱ्यांसमोर उभा आहे. केंद्र आणि राज्य शासनाचा लॉकडाऊन नकोच, असे व्यापारी म्हणाले.
घर कसे चालवायचे...
लॉकडाऊनमुळे व्यवसाय डबघाईस आला असून घर कसे चालवायचे, असा सवाल आहे. दुकान आणि घरचा मोठा खर्च आहे. शिवाय मुलांचे शिक्षण आणि अन्य खर्चाचा बोजा आहे. लॉकडाऊनने उत्पन्नाच्या वाटा बंद झाल्या आहेत.
- नलिनी वसानी, गृहिणी.
दुकान बंद, उत्पन्न बंद
लॉकडाऊनमध्ये कपड्याचे दुकान बंद झाल्याने उत्पन्नाचे साधन तुटले आहे. बँकांचे कर्ज, कर्मचाऱ्यांचा पगार व अन्य खर्चासह घरखर्चाचा भार वाढला आहे. उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त असल्याने जमा रक्कम संपायच्या मार्गावर आहे. शासनाने दुकाने सुरू करावीत.
- वासंती जैन, गृहिणी.
दुकान बंद करणे हाच उपाय
जनरल स्टोअर्स बंद असल्यानंतरही व्यापाऱ्यांची उधारी, बँकांचे कर्ज, कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्च कायम आहे. बँकेतील ठेवीतून खर्च सुरू आहे. घरखर्च आणि मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कसा खर्च करायचा, हा सवाल आहे.
- देवांगी राठी, गृहिणी.
जमा ठेवीतून खर्च
इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने बंद असल्याने उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. यंदा गुढीपाडव्याला व्यवसायाची अपेक्षा होती, पण त्यावरही पाणी फेरले गेले. मालाची उधारी द्यायला पैसे नाहीत. शिवाय घरखर्च आटोक्यात करावा लागत आहे.
- स्मिता खानोरकर, गृहिणी.
चार महिने सुरू राहिला व्यवसाय,
कर्ज कसे फेडायचे?
गेल्यावर्षी कोरोना लॉकडाऊनमुळे २४ मार्चला केंद्र सरकारने लॉकडाऊन लावला. त्यामुळे व्यवसाय पूर्णपणे बंद झाला. लॉकडाऊन जूनपर्यंत होता. त्यानंतर अनलॉक सुरू झाले. दिवाळीला व्यवसाय झाला. त्यानंतर व्यवसाय पुन्हा मंदीत आला. आता कुठे व्यवसाय सुरू झाला होता, तोच मार्चमध्ये दुकानांच्या वेळेवर बंधने आली. आता पुन्हा ५ एप्रिलच्या रात्रीपासून राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ अभियान सुरू केले. त्यामुळे दुकाने पूर्णत: बंद आहेत. कर्ज कसे फेडायचे, अशी समस्या मध्यम आणि गरीब व्यापाऱ्यांसमोर उभी आहे.
जिल्ह्यात १२० दिवस सुरू राहिली दुकाने