हे भयंकरच...६२ मृत्यू, ४,११० बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:08 IST2021-04-05T04:08:23+5:302021-04-05T04:08:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोना आणखी घातक ठरण्याची चिन्हे दिसून येत आहे. रविवारी एकाच ...

हे भयंकरच...६२ मृत्यू, ४,११० बाधित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोना आणखी घातक ठरण्याची चिन्हे दिसून येत आहे. रविवारी एकाच दिवसात जिल्ह्यात सर्वाधिक ४ हजार ११० बाधित रुग्ण आढळून आले तर ६२ रुग्णांचा मृत्यू झाला. एका दिवसात सर्वाधिक मृत्यू रविवारी नोंदविण्यात आले.
२ एप्रिल रोजी ४ हजार १०८ ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळले होते. दोन दिवसांत हा आकडादेखील पार झाला आहे. एका दिवसात सर्वाधिक ६४ मृत्यूंची नोंद १७ सप्टेंबर रोजी झाली होती. रविवारचे आकडे त्याच्याजवळ जाणारे ठरले.
एप्रिल महिन्याच्या चारच दिवसात १५ हजार ५६८ बाधित रुग्ण आढळून आले व २२९ जणांचा मृत्यू झाला. फेब्रुवारीच्या संपूर्ण महिन्यात १५ हजार ५१४ ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांची नोंद झाली होती व १७७ मृत्यू झाले होते. मात्र एप्रिलमध्ये चारच दिवसांत त्याहून अधिक आकडे नोंदविल्या गेले आहेत.
ग्रामीणमध्ये वाढतोय धोका
शहराच्या तुलनेत नागपूर ग्रामीणमधील स्थिती आणखी चिंताजनक झाली आहे. रविवारी शहरात व ग्रामीणमध्ये प्रत्येक २९ जणांचा मृत्यू झाला. ४ जण जिल्ह्याबाहेरील होते. बाधितांपैकी २ हजार ९०६ शहरातील तर १ हजार २०० ग्रामीण भागातील होते. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २ लाख ४१ हजार ६०६ बाधित आढळले असून मृत्यूचा आकडा ५ हजार ३२७ इतका झाला आहे.
१८ हजार चाचण्या
चाचण्यांची एकूण संख्या १८ हजार १३५ इतकी होती. यात शहरातील १० हजार ६०२ व ग्रामीणमधील ७ हजार ५३३ नमुने होते. आतापर्यंत जिल्ह्यात १६ लाख ९२ हजार ९७३ चाचण्या झाल्या आहेत.
४१ हजार ३७१ सक्रिय रुग्ण
रविवारी ३ हजार ४९७ रुग्ण बरे झाले. त्यात शहरातील २ हजार ५४२ व ग्रामीणमधील ९५५ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात ४१ हजार ३७१ सक्रिय रुग्ण आहेत. यात शहरातील २९ हजार ११५ व ग्रामीणमधील १२ हजार २५६ जणांचा समावेश आहे. सरकारी व खासगी इस्पितळांत ९ हजार ५७८ रुग्ण दाखल आहेत. तर ३१ हजार ७९३ रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये आहेत.
एप्रिलमधील रुग्णसंख्या
दिनांक : नवे बाधित : मृत्यू
१ एप्रिल : ३,६३० : ६०
२ एप्रिल : ४,१०८ : ६०
३ एप्रिल : ३,७२० : ४७
४ एप्रिल : ४,११० : ६२