आली दिवाळी ... खरेदीसाठी नागपुरातील बाजारात ग्राहकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 11:54 PM2019-10-25T23:54:44+5:302019-10-25T23:58:14+5:30

दिवाळीत सर्व बाजारपेठांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी आहे.महाल, इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी या बाजारात पाय ठेवायलाही जागा नाही.

It's Diwali ... a crowd of consumers in the market for shopping | आली दिवाळी ... खरेदीसाठी नागपुरातील बाजारात ग्राहकांची गर्दी

आली दिवाळी ... खरेदीसाठी नागपुरातील बाजारात ग्राहकांची गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देकोट्यवधींची उलाढाल : फटाके, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीत सर्व बाजारपेठांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी आहे. महाल, इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी या बाजारात पाय ठेवायलाही जागा नाही. आर्थिक मंदी असल्याचे म्हटले जाते. पण तोरणे, कंदील, पणत्या, शोभिवंत वस्तू, रांगोळी, फराळ, सुका मेवा, कपडे यांची रेलचेल आणि हे खरेदी करण्यासाठी बाजारांमध्ये तितकीच गर्दी उसळलेली दिसत आहे.


‘माझ्या घरी ही दिवाळी, असे म्हणत दरवर्षी नव्या दमाने, नव्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जातो. नागपूरच्या दिवाळीची मजा काही वेगळीच आहे. हातावर पोट भरणाऱ्या गरीबाच्या झोपडीपासून लखपती करोडपतींच्या आलिशान बंगल्यातही तोच झगमगाट दिसतो. 

मॉल, गल्लीबोळातील दुकानांमध्ये दिवाळीसाठीच्या नवनवीन वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यावर्षी विधानसभा निवडणुकांमुळे या बाजारामध्ये चार दिवसांपर्यंत तुरळक गर्दी होती. मतदान होताच नागपूरकरांनी खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी केल्याचे दिसत आहे. बहुतांश सर्वच वस्तू एकाच ठिकाणी मिळत असल्याने महाल, इतवारी आणि सीताबर्डी मार्केटमध्ये जाऊन खरेदी करण्याकडे अधिक ओढा दिसतो. सुका मेवा, चॉकलेट्स, खेळणी, कॉस्मेटिक्स, वेगवेगळ्या वस्तू, गिफ्ट रॅपर्स, निरनिराळ्या आकाराच्या पिशव्या, भेटवस्तू, परफ्युम्स आदी सर्व अत्यावश्यक गोष्टींची दुकाने येथे आहेत. लखनवी कपडे, खादीचे कपडे, ब्रॅण्डेड कपडे, लहान मुलांचे तयार कपडे, विविध ब्रॅण्डच्या कॉस्मेटिक्स वस्तू, पडदे, सोफ्याची कापड, दिव्याची तोरणे, कंदील, पणत्या व अन्य बरेच खरेदीसाठी उपलब्ध आहे. प्लास्टिक बंदी असली तरी विक्रेत्यांनी उरलेल्या प्लास्टिकच्या कंदिलांचा स्टॉक बाहेर काढला आहे. लोकांचा कल मात्र कागदी, कापडी आणि लाकूड तसेच बांबूपासून बनविलेल्या कंदिलाच्या खरेदीकडे आहे.

प्लास्टिकच्या तुलनेत हे कंदील महाग आहेत मात्र तरीही हेच कंदील लोकांच्या पसंतीला उतरत आहेत.
इलेक्ट्रिक सामानाची बाजारपेठ रंगीबेरंगी तोरणांनी सजली आहे. तोरणासोबत, लाईट, क्रिस्टल दिवे, लटकते दिवे अशा अनेक प्रकारच्या दिव्यांचा लखलखाट पसरला आहे. कर्टन्स लाईट, थ्रेड लाईट, फायबर बॉल्स अशा दिव्यांची नवीन तोरणे बाजारात असली तरी जुन्या रंगीबेरंगी तोरणांना अधिक मागणी आहे. मार्केटमध्ये विविध रंगाच्या मोत्यांच्या-खड्यांच्या लेस, दागिने, कपडे, पूजासाहित्य, देवादिकांच्या मूर्ती, भांडी आदी सर्वकाही मिळते.
दिवाळीत तिखट गोड फराळ करण्याची आणि घराघरात वाटण्याची परंपरा आहे. खमंग चकल्या, चविष्ट चिवडा, गोड लाडू, खुसखुशीत शंकरपाळे, मिठाईचे पदार्थ घरी बनविले जातात. मात्र वेळेअभावी सध्या फराळही बाजारातून खरेदी करण्याचा ट्रेंड वाढत आहे. पारंपरिक पोह्याच्या चिवड्यापासून ते मका चिवडा, चकली, शंकरपाळी, करंजी, अनारसे, शेव, लाडू आदी पदार्थ इतवारीत मिळतात. काळानुरूप दिवाळी साजरी करण्यात काही बदल जाणवत आहे. पण नागपूरची दिवाळी वेगळीच असते, हे विशेष.

Web Title: It's Diwali ... a crowd of consumers in the market for shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.