आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच बनविले बनावट कस्टमर, ४.८३ कोटींचा ‘रिफंड’ घोटाळा

By योगेश पांडे | Updated: April 6, 2025 22:10 IST2025-04-06T22:10:07+5:302025-04-06T22:10:07+5:30

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

it company employees created fake customers refund scam worth rs 4 crore 83 lakh | आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच बनविले बनावट कस्टमर, ४.८३ कोटींचा ‘रिफंड’ घोटाळा

आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच बनविले बनावट कस्टमर, ४.८३ कोटींचा ‘रिफंड’ घोटाळा

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : एका आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बनावट कस्टमर्स तयार करत ‘रिफंड’चा मोठा घोटाळा केला. सात कर्मचाऱ्यांनी मिळून कंपनीला ४.८३ कोटींचा गंडा घातला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मिहान येथील हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीतील कर्मचाऱ्यांनी हे फसवणुकीचे रॅकेट सुरू केले होते. जयंत समीर दास (एनआयटी कॉलनी, नारा मार्ग), आदित्य वसंत डोंगरे (माॅडेल मिल चौक), पियुष योगेश सोडारी (भाग्यश्री ले आऊट, त्रिमूर्तीनगर), मुकेश कुमार (बाईरपुरा, मस्कासाथ), पवन प्रल्हाद चचाने (स्नेहदीप कॉलनी), अजिंक्य प्रदीपराव मेश्राम (गोपालनगर, तिसरा बसस्टॉप) व सुरेंद्रकुमार हरीराम आगासे (महात्माफुलेनगर, सोमलवाडा) अशी आरोपींची नावे आहेत. कंपनी ही ई कॉमर्स क्षेत्रात काम करते व ग्राहकांना विविध सेवा पुरविल्या जातात. ग्राहकांना समस्या असल्यास कंपनीचे कर्मचारी प्रणालीतील पद्धतीनुसार तक्रारींचे निवारण करतात. जर ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तूबाबत तक्रार असेल तर त्या वस्तू परत बोलवून रक्कम रिफंड केली जाते.

आरोपींनी २९ डिसेंबर २०२३ ते २७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कंपनीचे बनावट कस्टमर तयार केले. त्या बनावट कस्टमर्सच्या आयडीवरून ऑनलाईन तक्रारी केल्या व रिफंडची प्रक्रिया केली. मात्र डिलीव्हर झालेल्या वस्तू मात्र परत घेतल्याच नाहीत. अशा पद्धतीने आरोपींनी ४.८३ कोटींचा गैरव्यवहार केला. कंपनीच्या क्वॉलिटी टीमला डेटा तपासणीत हा प्रकार लक्षात आला. कंपनीने सखोल चौकशी केली असता केवळ दोन तीन प्रकरणे नव्हे तर अनेक प्रकरणांत असा प्रकार झाल्याचे समोर आले. कंपनीचे महाव्यवस्थापक अरविंद मलगुंड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणूक तसेच आयटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: it company employees created fake customers refund scam worth rs 4 crore 83 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.