लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतर अकृषक विद्यापीठांमध्ये अव्यवसायिक अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क ४० ते ५० रुपये असताना कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाकडून बी.ए. नागरी सेवा अभ्यासक्रमासाठी ६७५ रुपये शुल्क आकारले जात आहे. परीक्षा शुल्काच्या नावे संस्कृत विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांची लूट सुरू आहे, असा गंभीर आरोप स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने केला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि इतर अकृषक विद्यापीठांमध्ये अव्यवसायिक अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क प्रतिविषय केवळ ४० ते ५० रुपये आहे. संस्कृत विद्यापीठात बी.ए. नागरी सेवा अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत ६०० रुपये शुल्क आकारले जात होते. त्यात आता पुन्हा ७५ रुपयांची वाढ करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेने संस्कृत विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांना यासंदर्भात निवेदन देत परीक्षा शुल्क कमी करण्याची मागणी केली आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, अकृषक विद्यापीठाच्या तुलनेत संस्कृत विद्यापीठात दुप्पट-तिप्पट शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतले जाते. नागपूर विद्यापीठाचा धर्तीवर संस्कृत विद्यापीठाने परीक्षा शुल्काचा विचार करावा, अशी मागणी केली आहे तसेच बी.ए. नागरी सेवा या पदवी अभ्यासक्रमाच्या हिवाळी २०२४ परीक्षेचा पाचव्या सत्राचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे निकाल लवकर जाहीर करावा अशीही मागणी करण्यात आली. निवेदन संघटनेचे जिल्हा सचिव संदेश रामटेके, कोषाध्यक्ष अमित हटवार व उपाध्यक्ष संघर्ष हटवार यांनी दिले.